
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अर्चना घारे यांनी आडाळी एमआयडीसी संदर्भात प्रश्न का मांडला नाही अशी विचारणा करणारे भाजपाचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनाही आमचा सवाल आहे. राज्यात स्थानिक आमदार असलेल्या पक्षासोबत भाजपाही सत्तेत आहेत. शिवाय केंद्रात नारायण राणे मंत्री आहेत. मग आपण का आडळीत अद्याप उद्योग आणला नाहीत असा रोखठोक सवाल दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ नाडकर्णी यांना विचारला आहे. दोडामार्ग येथे राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नाडकर्णी यांच्या अर्चना घारे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अर्चना घारे परब यांनी आडाळी एम आय डीसी प्रश्न का मांडला नाही असा सवाल उपस्थित केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी पञकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा सरचिटणीस संदिप गवस, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर शहर अध्यक्ष सुदेश तुळसकर, युवा अध्यक्ष गौतम महाले, सागर नाईक, उल्हास नाईक, आनंद तुळसकर, विलास सावळ, उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप गवस व प्रदीप चंदेलकर यांनी दोडामार्ग येथील राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा शंभर टक्के यशस्वी झाला हे मिञ पक्षांनी कबूल केले आहे. तळागाळातील लोक खासदार सुप्रिया सुळे अर्चना घारे परब यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर विश्वास ठेवून दाखल झाले होते. त्यामुळे विरोधकांना काही तरी बोलायला पाहिजे म्हणून अर्चना घारे परब यांना आडाळी एम आय डीसी मुद्दा घेऊन टार्गेट केले गेले असल्याचे सांगितले.
दोडामार्ग तालुक्यातील युवती युवती यांना रोजगार मिळाला पाहिजे ही भावना अर्चना घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. तसेच इतर पक्षांची आहे. राजकारणा विरोधात राजकारण करून रोजगार प्रश्न सुटणार नाही तेव्हा नाडकर्णी यांना विनंती आहे. विरोध म्हणून न बोलता एकञ येऊन रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
महाविकास आघाडी सरकार काळात जी मंडळी होती तेच नेते आमदार, मंत्री आज भाजपा सोबत आहेत. केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता आहे. पालकमंञी भाजपाचे आहेत. उपमुख्यमंत्री भाजपाचे आहेत. शिवाय आडाळी एम आय डीसी मंजूर करणारे केंद्रीय सुक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणे आहेत. एखनाथ नाडकर्णी यांचे ते जवळचे सहकारी आहेत. उद्योगमंत्री मित्र पक्षाचे आहेत. मग त्यांच्या मंत्री पदाचा उपयोग दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे उद्योग सुरू करण्यासाठी का केला नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
आडाळी एम आय डीसी उद्योग सुरू झाले पाहिजे यासाठी भाजपाचे राजन तेली यांनी आडाळी ते बांदा लाॅग मार्च काढला. यात सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. नाडकर्णी यांना जर याचा विसर पडला तर तेव्हाचे फोटो व्हिडिओ याची त्यांनी पाहणी करावी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अनेकांच्या घरी जाऊन अर्चना घारे सर्व सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना जनतेची काळजी आहे आणि त्या त्यासाठी कार्यरत आहेत.