उमेदवारांची नाराजी दूर करणार : मंत्री नितेश राणे

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 19, 2026 14:10 PM
views 235  views

कणकवली : महायुतीचा '३१-१९' फॉर्म्युला निश्चित जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत ३१ आणि १९ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवून आम्ही विजय मिळवू, असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. बंडखोरीच्या चर्चेवर नितेश राणेंचे उत्तर देत पक्षात काही ठिकाणी राजीनामे आणि बंडखोरीच्या चर्चा सुरू असल्याचा प्रश्न विचारला असता, नितेश राणे म्हणाले: "भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा 'राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी' या विचाराने चालणारा आहे. प्रत्येकाकडे निवडणूक लढवण्याची क्षमता आहे आणि अनेक जण इच्छूक आहेत. मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधत आहे. कोणालाही असं वाटणार नाही की पक्षाने त्यांचे ऐकले नाही."

नाराजी दूर करण्यासाठी बैठकांचे सत्र :

पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ते दिवस-रात्र जिल्ह्यात फिरून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आहेत. आज संध्याकाळी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची अंतिम बैठक होणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर केली जाईल. "नाराजी ही तात्पुरती आहे, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल," असेही त्यांनी नमूद केले. नारायण राणे यांचा शब्द अंतिम गेल्या २५ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सन्माननीय नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यामुळे राणे साहेब जो निर्णय घेतील, तो प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य असेल, अशी ग्वाही नितेश राणे यांनी दिली. जर कोणी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी केली, तर त्या संदर्भात पक्ष योग्य वेळी विचार करेल असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.