
मंडणगड : "हर घर तिरंगा" मोहिमेचे अंतगर्त पंचायत समिती, मंडणगड येथे 13 ऑगस्ट 2025 रोजी रानभाज्या महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी फायदे तसेच रानभाज्यांपासून बनणाऱ्या पारंपरिक पाककृतींचे प्रदर्शन यावर विशेष भर देण्यात आला. विविध महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रानभाज्यांचे प्रकार, त्यांपासून तयार पाककृती पद्धतींचे प्रदर्शन सादर केले.
यावेळी बोलताना मनोगतामध्ये वैदेही रानडे यांनी ग्रामीण भागातील पारंपरिक अन्नसंपदा जपण्याचे व आरोग्यदायी आहाराचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा हा उपक्रम स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा ठरेल, असेही त्या म्हणाल्या. मंडणगड तालुक्यास भेट देणाऱ्या श्रीमती वैदेही रानडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मुळगावास भेट दिली. याबरोबर आंबवडे येथील प्राथमिक उपकेंद्रास भेट देवुन तेथील व्यवस्थांची पाहणी केली.
दौऱ्याचे निमीत्ताने मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचे इमारतीची पाहणीही केली. भिंगळोली ग्रामपंचायतीचे क्षेत्रात वृक्षारोपण केले. या प्रसंगी हर्षल चव्हाण, कार्यकारी अभियंता (चिपळूण), सुनील खरात, गटविकास अधिकारी, मंडणगड, डॉ. अभिषेक गावंडे - तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याणी मुळे गटशिक्षण अधिकारी; देवकीनंदन सकपाळे शाखा अभियंता, पूजा शिंदे पशुधन विकास अधिकारी, रूपाली मुळे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) आदी मान्यवर उपस्थित होते. पाककृती स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्वेता रेवाळे- कृषी अधिकारी पंचायत समिती दापोली, कल्याणी मुळे - गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती मंडणगड, मानसी पवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी काम पाहिले.
पाककला स्पर्धेत प्रीती जावडेकर पालवणी यांनी प्रथम, निर्वि शेडगे तुळशी यांनी व्दितीय, समीक्षा लोखंडे कुंबळे यांनी तृतिय क्रमांक मिळवीला. महोत्सवाचे निमीत्ताने विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, स्थानिक नागरिक व पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.