
मालवण : मालवण बंदर मुख्य मार्गावर रुंदीकरण व गटार बांधण्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित कामाच्या दर्जाची तपासणी आपल्या स्तरावरून व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे स्थानिक नागरिक तथा मत्स्य पर्यटन व्यवसायिक यांच्यावतीने मालवण बंदर निरीक्षक यांना करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही यापूर्वीही बंदर विभागाचे तसेच अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले आहे. मालवण बंदर जेटी मुख्य मार्गांवर रुंदीकरण व गटार बांधणी करण्यात आली आहे. ते काम योग्य दर्जाचे झाले नाही. ठेकेदारच्या अश्या कामांमुळे नागरिकांना सुविधा मिळण्यापेक्षा त्रास वाढणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे साहेब, आमदार निलेश राणे साहेब महायुती सरकार माध्यमातून मोठया प्रमाणात निधी विकास कामांसाठी जनतेच्या सेवा सुविधा यांसाठी आणत आहेत. असे असताना काही ठेकेदार यांच्या चुकिच्या व दर्जाहिन कामांमुळे नागरिकांना समस्या निर्माण होत आहेत.
बंदर जेटी येथे होत असलेले काम योग्य पद्धतीने न झाल्यामुळे मार्ग उखडत आहे. पावसात गटारातून पाणी योग्य पद्धतीने जाणार नाही. अशी स्थिती आहे. तरी या कामाचे एस्टीमेट, कामाचे स्वरूप याबाबत माहिती आम्हाला मिळावी. सोबतच या कामाच्या दर्जाची तपासणी आपल्या स्तरावरून व्हावी. त्यांची माहितीही आम्हाला मिळावी. अशी मागणी सदर निवेदनाद्वारे केली आहे.
अन्यथा याबाबत पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे लक्ष आम्ही मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक वेधणार असून, वरील कामाची तक्रार करणार आहोत. पालकमंत्री, आमदार निश्चित आम्हाला न्याय देतील, असा विश्वास देखील सदर निवेदनातून स्थानिक नागरिक तथा मत्स्य व पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी रोहन आचरेकर, संजय नार्वेकर, किर्णीदा, तारी, तुकाराम जोशी, अब्दुल मुकादम, आनंद आचरेकर, गणेश भोगले, तुषार मिसाळ, मनोज आढाव, धीरज बोडेकर, रोशन भोगले, मनोज आढाव, गणेश खरात, अमित पाटकर, रोशन सावंत, निमेश गोवेकर, जॉनी फर्नांडिस, दीपक कुडाळकर, हेमंत रामाडे, विल्सन फर्नांडिस, अनमोल आढाव, संजय लांबोरे, राजेश आढाव प्रज्वल पाटील, आदी उपस्थित होते.