...तर पैसे वाटण्याची वेळ का आली ?

राजन तेली आणि सतीश सावंत यांचा सवाल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 27, 2025 17:44 PM
views 186  views

कणकवली : मालवणमध्ये आमदार निलेश राणे यांनी पैसे वाटपाचा प्रकार उघडकीस आणला. मात्र, कणकवलीतही तोच प्रकार सुरू आहे. येथील गतवेळच्या सत्ताधाऱ्यांनी दहा वर्षात खरोखरच विकास केला असेल, तर त्यांच्यावर प्रति मत दहा हजार रुपये देण्याची वेळ का आली? असा सवाल माजी आमदार राजन तेली व उबाठा शिवसेना कणकवली विधानसभा शप्रमुख सतीश सावंत यांनी केला. 

राजन तेली यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तेली, श्री. सावंत बोलत होते. सतीश सावंत म्हणाले, मालवण मध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये भाजप किंवा आरएसएसचा सहभाग होता का? कारण पैसे वाटणे ही आरएसएसची संस्कृती नाही. असेच पैशांचे वाटप निवडणुकांमध्ये होऊ लागले तर भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभार कसा होणार? अशाच कारणांमुळे विकास निकृष्ट दर्जाचा होतो. मात्र कणकवलीचे मतदार सुज्ञ असून संदेश पारकर यांनी यापूर्वी सरपंच व नगराध्यक्ष म्हणून केलेले कामही लक्षणीय आहे. पारकर निवडून येतील व सर्वसामान्यांना सोबत घेऊनच पुढे जातील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.‌कणकवली तेही पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप काल संदेश पारकर यांनी केला. अनेक लोक विरोधकांच्या भीतीपोटी पैसे स्वीकारत आहेत. वास्तविक संदेश पारकर हे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे नेतृत्व असल्याने शहरवासीय त्यांनाच साथ देतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

राजन तेली म्हणाले, मागील दहा वर्षात भरपूर विकासकामे केल्याचे गतवेळचे सत्ताधारी सांगत आहेत. मग त्यांना मतामागे दहा हजार रुपये वाटण्याची वेळ का आली? एका प्रभागात पैसेवाटप सुरू होते, याबाबत एका मतदाराने आम्हाला फोन करून कळवले. मात्र आम्ही तिथे पोहोचेपर्यंत पैसे वाटणारे प्रसार झाले होते, अशी माहिती ही राजन तेली यांनी दिली. त्यांना पैसे वाटण्याची वेळ आली याचाच अर्थ त्यांचे काम मतदारांच्या पसंतीस उतरलेले नाही. पराभव समोर दिसू लागल्यानेच पैसे वाटपाचे प्रकार सुरू असल्याचा आरोप तेली यांनी केला. नगरपंचायतीत निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होत असल्याचा प्रकार मी पहिल्यांदाच बघत आहे, असेही ते म्हणाले.


मालवण मध्ये पैसे वाटपाचा प्रकार निलेश राणेंनी हाणून पाडला, त्यावेळी त्यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला गेला. पण निलेश राणे डगमगले नाहीत. वास्तविक आमचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. पण पैसे वाटपाचा प्रकार काहीजणच करत आहेत. विजय केनवडेकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत. संघाने त्यांना असे पैसे वाटप करण्याच्या गोष्टी शिकवल्या का? कारण संघाचे‌लोक राष्ट्रहिताचा विचार करतात. कणकवलीत आमचे विरोधक संघाच्याही एका व्यक्तीकडे पैशांचे पाकीट घेऊन गेले होते. मात्र त्या व्यक्तीने पैसे स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला, असेही दिली म्हणाले 

अनेक लोक यांच्या भीतीपोटी पैसे स्वीकारत आहेत. कारण पैसे स्वीकारले नाहीत तर ही मंडळी त्रास देईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे प्रशासनाने या बाबींवर लक्ष ठेवायला हवा.‌ निलेश राणे यांनी जी तक्रार दिली आहे ते प्रकरण तडीस जायला हवे, असेही तेली म्हणाले.‌

कणकवलीत स्थानिक शेतकऱ्यांच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकली आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली. याबाबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच तोडगा काढला जाईल. नागरिकांनीही निलेश राणे यांनी आमची भेट घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार निलेश राणे हे देखील येथील नागरिकांना भेटण्यासाठी येणार आहेत, असेही तेली म्हणाले.

वैभव नाईकांची माहिती चुकीची

विजय केनवडेकर हे विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्यासाठीही पैसे वाटप करत होते, या आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या विधानाविषयी विचारले असता तेली म्हणाले, वैभव नाईक यांची माहिती चुकीची आहे. कारण निलेश राणे यांचे काम दत्ता सामंत आणि बाकीची मंडळी करत होती, असे हे तेली म्हणाले.