'ते' पोलीस अवैध धंद्यांबाबत गप्प का?

परशुराम उपरकरांचा सवाल
Edited by:
Published on: October 08, 2022 19:20 PM
views 285  views

कणकवली : पीएफआय संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईची मागणी मनसेने केली. यासाठी सावंतवाडी येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. मनसेच्या या कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल करत असतील तर इतर अवैध धंद्यांबाबत हेच पोलीस गप्प का? याबाबत मनसेच्यावतीने हिंदू जनजागृती करत लवकरच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

संपूर्ण देशभरात पीएफआईच्या कार्यालयांवर धाडी टाकल्यानंतर पुण्यामध्ये काही समाजकंटकानी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. हे देश विघातक कृत्य आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर कारवाईसाठी मनसेच्यावतीने सावंतवाडी येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठविण्यासाठी देण्यात आलेल्या या निवेदनावेळी हिंदुस्तान झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. जिल्ह्यात मनाई आदेश असताना अशा घोषणा दिल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुळात ज्या समाजकंटकानी पाकिस्तान झिंगदाबादच्या घोषणा दिल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास वेळ लावण्यात आला.

त्यानंतर केंद्र शासनाने या संघटनेवर बंदी आणली तर नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनीही असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. मात्र असे असताना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या बाहेर हिंदुस्तान झिंगदाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणे हा गुन्हा आहे का? याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांची पत्रव्यवहारही करणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

मनाई आदेशाचा भंग म्हणून पोलीस असे गुन्हे दाखल करत असतील, तर जिल्ह्यात अवैध दारू, मटका, जुगार व इतर धंदे राजरोस सुरू आहेत. हे सर्व कायद्यात बसत आहे का? याबाबत पोलीस मूक गिळून गप्प का आहेत. म्हणूनच या साऱ्या प्रकाराबाबत हिंदूंमध्ये जनजागृती करत लवकरात मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा परशूराम उपरकर यांनी दिला आहे.