
▪️कधी होणार दोषींवर कारवाई ?
सावंतवाडी : सावंतवाडी येथील सुमारे १४३ वर्षे जुन्या जिल्हा कारागृहाची ४० मीटर लांबीची ऐतिहासिक तटबंदी नुकतीच कोसळली. यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झालेत. अशा जुन्या आणि ऐतिहासिक वास्तूचे परिक्षण न करताच तटबंदी वाढवण्याची शिफारस कोणी केली ? हा आता कळीचा मुद्दा बनला आहे. तसेच बांधकामांच्या विशेष पथकानं घटनास्थळी दाखल होत दगडांच्या जॉईंटमधील माती ठिसूळ होऊन त्यात पावसाचे पाणी गेल्याने ही भिंत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे ही तटबंदी कोसळण्यास नेमका जबाबदार कोण ? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
कारागृहाची ही भिंत सुमारे १४३ वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. संस्थानकालीन या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक होते. तिची क्षमता जाणून घेतल्यानंतरच संरक्षक भिंतींची उंची वाढवण योग्य ठरले असते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या घटनेसाठी कोणाला जबाबदार धरतो ? हे महत्त्वाचे ठरणार आहे. भिंत कोसळल्यानंतर या कारागृहाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी एक विशेष पथक पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार घटनास्थळी दाखल झाले. कारागृहाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडांच्या जॉईंटमधील माती ठिसूळ होऊन त्यात पावसाचे पाणी गेल्याने ही भिंत कोसळली असा प्रथमदर्शनी अंदाज त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सुमारे १४३ वर्षांपूर्वीच्या या इमारतीच्या तटबंदीच्या भिंतीवर अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढीव साडेचार फुटाचे दगडी बांधकाम केले होते. यासाठी सुमारे ३२ लाख रुपये खर्ची घातले गेले. त्यामुळे या वाढीव बांधकामाचे वजन न पेलवल्यामुळेच संरक्षकभिंत कोसळली असा आरोप होत आहे. हे बांधकाम संस्थानकालीन असल्याने, बांधकाम विभागावर टीकेची झोड उठली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कोसळलेल्या भिंतीची पाहणी केली. संपूर्ण कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना संबंधितांना दिली होती. तसेच हे कारागृह भिंत नव्याने पुन्हा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी दाखल झालेल्या विशेष टीममध्ये अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरीचे मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या सलोनी निकम, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावंतवाडी वैभव सगरे, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रा. महेश साळुंखे आणि कोल्हापूरचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट मंदार आंबेकर यांचा समावेश होता. संस्थानकालीन जिल्हा कारागृह संरक्षक भिंत माती आणि दगडांपासून बांधण्यात आली होती. जवळपास १४३ वर्षे पूर्ण झाल्याने बांधकामासाठी वापरण्यात आलेली माती ठिसूळ झाली आहे तसेच पावसाचे पाणी दोन दगडांमधील जॉईंटमध्ये गेल्याने बांधकामाला धोका निर्माण झाला आणि यातून ही भिंत कोसळली असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. ऐतिहासिक वास्तू असलेल्या या तटबंदीवर साडेचार फूट वाढीव बांधकाम सिमेंट आणि दगडी चिरे वापरून करण्यात आले होते. जुन्या दगड-मातीच्या संरक्षक भिंतीवर हे वाढीव काम ऐतिहासिक वास्तूला पेलेल की नाही ? याचा साधा अंदाजही बांधला गेला नाही. त्यामुळेच ऐतिहासिक वास्तूला धक्का बसल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, आता 'याला जबाबदार कोण?' असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारागृह तटबंदी नव्याने उभारण्यात येणार असली तरी चुकीच्या पद्धतीने काम कोणी केले. त्याला जबाबदार कोण ? ६ महिन्यांपूर्वी ३२ लाख खर्च घालताना संरक्षक भिंतींची परिस्थिती का पाहीली नाही ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. ऐतिहासिक वास्तूला धक्का बसणे हे शोभनीय नसून पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे यातील दोषींवर कोणती कारवाई होते हे पहावं लागणार आहे.