
कुडाळ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४४ नुसार गणेशोत्सवादरम्यान शक्तिशाली लेझर लाईट्सचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, गणेशोत्सवात काही मंडळे व सार्वजनिक मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच पशुपक्ष्यांना त्रास होतो. याशिवाय, लेझर लाईट्सच्या प्रकाशामुळे वाहनचालकांच्या डोळ्यांवर परिणाम होऊन अपघाताची शक्यता वाढते.
हे सर्व धोके लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी किंवा मिरवणुकीत शक्तिशाली लेझर लाईट्स वापरता येणार नाहीत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कठोर कारवाई केली जाईल. हा आदेश २८ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाला असून, गणेशोत्सवाच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच १९ सप्टेंबर २०२५ पर्यंत तो लागू राहील.