कोण बरा, कोण वाईट, कोण आपला ? सावंतवाडीकरांना दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही !

Edited by: विनायक गांवस
Published on: June 05, 2023 13:41 PM
views 148  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडी शहरात येणार आहेत. कोट्यावधीचा निधी शिंदेंनी सावंतवाडीला दिल्यानं त्यांच्या हस्ते विकासकामांची भुमिपूजन होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीकरांना विनम्र आवाहन करत असताना विरोधकांसह मित्रपक्ष भाजपलाच कोपरखळी लगावली आहे. मोठ्या जबाबदाऱ्या आल्याने गाठीभेटी घेता आल्या नाहीत, काही मंडळी त्याचे राजकारण करतात. ''कोण बरा, कोण वाईट, कोण आपला ? हे माझ्या सावंतवाडीकरांना दुसऱ्या कोणी येऊन सांगायची गरज नाही.'' असा खोचक टोला केसरकरांनी हाणला आहे. त्यामुळे भाजप विशेषतः केसरकर विकास करायला कसे कमी पडले ? हे वारंवार सावंतवाडीकरांना सांगणारे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यावर कोणत भाष्य करणार ? मतदारसंघातील केसरकर आणि भाजप यांच्यातील उघड धुसफूस एकनाथ शिंदेंसमोर दिसून येणार ? याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे. 


या विनम्र आवाहनात केसरकर म्हणतायत, गेले काही महिने राज्यातील स्थित्यंतरांमुळे आणि विशेष कार्यबाहुल्यामुळे मला आपली सातत्याने भेट घेत आली नाही त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. सावंतवाडी शहर आणि माझा मतदार संघ नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा माझे कुटुंब, परिवार आहे असे मी मानतो. सावंतवाडी शहर हे अध्यात्मिक, ऐतिहासिक शहर असून ही माझी जन्मभूमी आहे. सहाजिकच मातृऋण म्हणून हे शहर सुंदर आणि जनतेला सर्व सोयी-सुविधा देणारे असावे, या दृष्टीने मी राजकारणात येण्यापूर्वीपासून प्रयत्न केले. नगराध्यक्ष पदाची संधी जनतेने दिल्यानंतर प्रत्यक्ष काम करता आले. नगराध्यक्ष, आमदार, मंत्री अशी महत्त्वाची पदे जनतेने मला दिली त्यांचे ऋण मान्य करून मी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी शहरासाठी आणला. सावंतवाडी हे राज्यातील सर्वोत्कृष्ट शहर बनावे हे माझे आणि सावंतवाडीकरांचे स्वप्न आता साकार होईल याची खात्री वाटू लागली आहे.महाराष्ट्राचे कर्तव्य सम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडीच्या विकासासाठी मोठे योगदान देण्याचे अभिवचन दिलेले असून त्यांनी आपल्या नगरविकास खात्यामार्फत सावंतवाडी शहराला कोट्यवधीच्या विकास योजना मंजूर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शहराला भेट देणार असून त्यांच्या हस्ते सावंतवाडी शहराचा कायापालट करणाऱ्या विविध योजनांचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम होणार आहे. याचवेळी मुख्यमंत्री यांचा शानदार नागरी सत्कारही करण्यात येणार आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, सहकार्य शुभेच्छा हव्यात असं आवाहन केसरकरांनी केलं आहे. 


५७ कोटींची पाणी योजना


सावंतवाडी शहराच्या वाढत्या विस्तारामुळे पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. तो कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगर विकास खात्यामार्फत ५७ कोटींची पाणी योजना हाती घेतली आहे. ती पूर्ण होताच २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. सध्यस्थितीतही पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्ती, वनविभागाकडून येणारे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली असून आवश्यक पाईपलाईन व तत्सम कामे करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.


२८ कोटींचे नवे गाडगेबाबा महाराज मार्केट


सावंतवाडीत जुने भाजी मार्केट गाडगेबाबा मंडईच्या जागी सुमारे २८ कोटींचे दोन टप्प्यात भव्य मार्केट उभारण्यात येणार आहे. शहरातील नाट्यगृहाचे आधुनिकीकरण होत असले असून ते वातानुकूलित बनविण्यात येत आहे. त्यासाठी पालकमंत्री असताना दोन कोटीचा निधी दिला असून त्याचे काम पूर्णत्वास आले आहे.


३४ कोटींचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल


शहरात सुमारे ३४ कोटींच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुटला असून त्याचे काम होत आहे. मा. मुख्यममंत्री महोदयांनी त्यासाठी मान्यता दिली असून घोषणा आणि कार्यवाही करण्यात येईल.


मोफत रुग्णसेवा केंद्र


सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी आणखी दोन केंद्र रुग्णालये-सालईवाडा व जिमखाना रोड येथे सुरु होतील. नगरपरिषदेच्या मोफत रुग्णसेवेप्रमाणे या रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येईल. सावंतवाडी शहरातील बसस्थानकाचे रेंगाळलेले काम वेगाने करण्याचे दृष्टीने निधी वाढविण्यात येऊन बसस्थानकाचे अत्याधुनिकीकरण करण्याचे सूचना दिल्या आहेत. सावंतवाडी शहराच्या चौफेर विकासाच्या दृष्टीने जिमखाना येथे ५ कोटींचे पॅव्हेलीयन, १ कोटीची ड्रेसिंग रूम, योगा सेंटर, बाहेरचावाडा येथे नवे सुसज्ज मटण मार्केट, तसेच स्कील डेव्हलपमेंट सेंटरची इमारत मंजूर केली. आहे. जिमखान्यावर ५ क्रीडा संकुले उभारून नवोदित खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होईल.राजवाड्याशेजारी म्युझियमची उभारणी, आणि हस्तकलेचे प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.शहरातील सबनीसवाडा व वैश्यवाडा येथील नाले बंदिस्त करावे आणि शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण यासाठी निधी उपलब्ध केला आहे. सिंधुरत्न योजनेतून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने नगर परिषदेकडे निधी वर्ग केला आहे.


तलावाचे सौंदर्यीकरण


सावंतवाडी शहराने यापूर्वी राज्यात आपल्या नावाचा ठसा उमटविलेला आहे. हे शहर राज्यातच नव्हे तर देशाच्या नकाशावर गौरवाने झळकावे यादृष्टीने तलावाचे सौंदर्यीकरण, कारंजा, लेजर शो, वॉटर स्पोर्टस् आदि उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. आठवडा बाजाराच्या प्राथमिक सुविधांसाठी आमदार निधीतून रु. ५० लाखांचा निधी दिला असून भाजी विक्रेते, नागरीक यांची गैरसोय दूर होऊन नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे बांधकाम खाते असताना त्यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्गतालुक्यातील रस्त्यांच्या नूतनीकरण, दुरुस्तीसाठी सुमारे ४० कोटींपेक्षा जास्त निधी दिला.

सांवतवाडीप्रमाणे दोडामार्गात सुमारे २७ कोटी खर्चाच्या नव्या हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे.


सर्वांची साथ व शुभेच्छा हव्यात !


गेले काही महिने राजकीय स्थित्यंतर नवनव्या मोठ्या जबाबदाऱ्या आल्याने गाठीभेटी घेता आल्या नाहीत, काही मंडळी त्याचे राजकारण करतात. त्याबाबत काही टिप्पणी न करता सावंतवाडी मतदार संघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कसा विकास होईल याचा मी विचार करतो. आपल्या सारख्या सूज्ञ नागरिकांच्या विचारसरणीवर माझा विश्वास आहे. कोण बरा कोण वाईट कोण आपला हे माझ्या सावंतवाडीकरांना दुसऱ्या कोणी येऊन सांगायची गरज नाही. माझ्या या प्रयत्नांना आपली सर्वांची साथ निश्चितच मिळेल. वेळात वेळ काढून मी आठवड्यातून सोमवार हा वार आपणासाठी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी आपले प्रश्न, समस्या यांचे आदान-प्रदान करता येईल. काही प्रश्न, समस्या सोडवता येतील. सकारात्मक दृष्टीने आपण प्रगतीच्या दृष्टीने पावले टाकूया ! सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान नरेंद्र  साहेब यांच्या वचनानुसार एकसाथ चालुया! असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी करत असतानाच विरोधकांसह भाजपला देखील कोपरखळी मारली आहे.