
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूच्या किंमती कमी करा अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर सावंतवाडीमध्ये ठेवणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना म्हणावे तरी काय ? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दारूच्या किंमती कमी करा म्हणून सांगत आहेत. अशा शिक्षणमंत्र्यांचा आदर्श मुलांनी काय ठेवावा ? असं मत साळगावकर यांनी व्यक्त केले आहे.
गॅस सिलेंडरच्या किंमती चौपट वाढलेल्या आहेत. अशात माता भगिनींचे अश्रू पुसावे असे त्यांना वाटले नाही. मध्यमवर्गीय आणि गरीब जनता महागाईने होरपळत आहे. रोजचं घर चालवणे त्यातच एखाद्या आजारपण आलं तर त्याचा खर्च, लाईट बिल, पाणी बिल, शाळेचा मुलांचे खर्च या खर्चामध्ये जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. जीवनाश्यक वस्तूंचे भाव कमी करा म्हणून कधी आंदोलन, प्रश्न शासन दरबारी मांडताना हे जनतेला दिसले नाही. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूचा किंमती कमी करा धोरण ठरवा ही मागणी दीपक केसरकर यांनी केली. त्यामुळे इथल्या महिला भगिनींनी काय समजावं ? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पत्रकार आणि संस्था दारू आणि अंमली पदार्थाच्या विरोधात आवाज उठवत असताना महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आणि भाषा मंत्री दारूच्या किंमती कमी करण्यासाठी आपलं वजन खर्च करत आहेत यापेक्षा शरमेची बाब कोणती ? अनेक प्रश्न या जिल्ह्याचे आहे ते प्रश्न मंत्री दीपक केसरकर यांनी सोडविण्यासाठी आंदोलन किंवा प्रश्न विचारताना जनतेला दिसलेलं नाही. पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूचा किमती कमी करण्यासाठी वजन वापरणाऱ्या शिक्षण आणि भाषा मंत्री यांचा तीव्र निषेध आहे. तर हा प्रश्न विरोधीपक्ष लावून धरायला उठाव करायला कमी पडल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाने एकत्रित या प्रश्नावरती गावागावात चौका चौकात निषेध करायला हवा. या प्रश्नावर सर्व विरोधीपक्ष जिल्हाध्यक्षांनी एकत्रित बैठक घेऊन जिल्ह्याचा कार्यक्रम ठराव असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.