पुष्पवृष्टी करत आदर्श शिक्षिका सुषमा प्रवीण मांजरेकर यांचं स्वागत

Edited by: विनायक गावस
Published on: September 02, 2023 16:06 PM
views 87  views

सावंतवाडी : आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांनी राज्यात डंका निर्माण केला आहे. महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. शनिवारी शाळेत दाखल होताच विद्यार्थी वर्गाने पुष्पवृष्टी करत त्यांच स्वागत केलय.


सौ. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) या गेली २१ वर्षे आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागामध्ये त्या मराठी व हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. मराठी, हिंदी, अर्थशास्त्र या तीन विषयात त्यांनी एमए पदवी संपादन केली आहे. तसेच शालेय व्यवस्थापन पदवी त्यांनी संपादन केला असून एम एड पदवी चा त्यांचा अभ्यासही सुरू आहे. कोकण बोर्ड मराठी विषय तज्ञ मार्गदर्शक, कोकण बोर्ड मॉडरेटर म्हणूनही सौ. मांजरेकर कार्यरत आहेत. 


महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे प्रा. सुषम मांजरेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. शाळेत दाखल होताच विद्यार्थी वर्गाने पुष्पवृष्टी करत त्यांच जंगी स्वागत केलय. 


सुषमा मांजरेकर यांनी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अंधायुग या नाटकाचे मराठीत पुनर्लेखन केले असून या नाटकाचे प्रयोगही महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धा विक्रोळी मुंबई व अन्य ठिकाणी प्रयोग झालेत. याशिवाय शुद्ध लेखनात येणाऱ्या समस्या व उपाययोजना या विषयावर लघु प्रबंध, कोरोना कालावधीतील आँनलाईन शिक्षण व उपाययोजना या विषयावर दीर्घ निबंध लेखनही केले आहे. कोरोना काळातील आँनलाईन शाळा व शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हे उपक्रमही सौ मांजरेकर यांनी राबविले आहेत. या काळात गोवा विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची १०-१२ वी परीक्षा घेण्यातही त्यांनी सहकार्य केले होते. याशिवाय अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धांमध्ये सौ मांजरेकर यांनी पारितोषिके पटकावली आहेत. शासकीय व विविध संस्थांच्या वकृत्व व निबंध स्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम केले आहे. सौ मांजरेकर यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. 

या निवडीबद्दल प्रा. मांजरेकर याच  सर्व स्तरातून कौतुक होत आहे.