दहशतवाद गाडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र !

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील : ब्रिगेडियर सुधीर सावंत
Edited by:
Published on: November 15, 2024 14:30 PM
views 289  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशतवाद गाडून टाकण्यासाठी आम्ही एकमेकांना विरोध करणारे आज एकत्र आलो आहोत. ही आमच्यातील एकी अभूतपूर्व असून जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागेवर पुन्हा एकदा भगवा फडकून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा विश्वास माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला. तर कोणी कितीही दावा केला तरी जिल्ह्यातील माजी सैनिक हे माझ्यासोबतच होते आणि माझ्या सोबतच राहतील असेही ते म्हणाले.ब्रिगेडियर सावंत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचार कार्यालयात परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. 

ब्रिगेडियर सावंत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मी पुन्हा एकदा नव्या रूपात समोर आलो आहे. मुळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते. त्यामुळे मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला याचा मला आनंद आहे. काँग्रेसमध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात संघटना बांधली होती. परंतु, दहशतवाद निर्माण करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी स्थान मिळाल्याने आपण विरोध करून काँग्रेस सोडली‌. आता सद्यस्थितीत शिवसेनेत काम करत असताना त्या ठिकाणीही तेच घडल्याने आपण पुन्हा एकदा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये काम करत असताना  ठाकरेंचा शांत स्वभाव मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले काम त्या सर्व गोष्टी आपल्याला भावल्या आहेत‌ एकूणच माझ्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुने शिवसैनिकही आज पुन्हा एकदा आपल्या मूळ प्रवाहात एकत्र आले आहेत. मुळात आमच्यात एकमेकांमध्ये मतभेद असताना सुद्धा आम्ही आज एकत्र आलो आहोत. आमच्यातील ही एकी अबूतपूर्व असून एका विचाराने आलो हेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जगावर विजयाची मशाल पेटवण्यासाठी पुरेसे आहे.

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आहेत. आज ते अन्य पक्षात जरी असले तरी विचाराने माझ्या सोबतच आहेत. माजी सैनिकांच्या सोयीचे असलेले या ठिकाणचे कॅन्टीन बंद करण्यात आले. माजी सैनिकांमध्ये याचा राग आहे. आम्ही एकूण बारा मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या होत्या. त्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी झिडकारल्या हा माजी सैनिकांचा अपमान आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी कितीही दावा केला तरी माजी सैनिक हे माझ्यासोबतच होते आणि माझ्यासोबतच राहणार आहेत. राजन तेली यांच्या बाबतीत मतदार चांगले वातावरण आहे. मागील दोन महिन्यापूर्वी आपण मतदार संघातील 17 गावांमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल लोकप्रियता दिसून आली. एकूणच त्यांचे काम आणि कार्य पाहता त्यांना या ठिकाणी विजय सोपा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राजू मसुरकर ठाकरे सेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आदी उपस्थित होते.