सावंतवाडीवर पाण्याची पुण्याई !

जपून पाणी वापरा : पाणी पुरवठा विभागाचं आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 16, 2024 11:22 AM
views 218  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरासह तालुक्यावर पाण्याची पुण्याई आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मे महिन्यात देखील पुरेसा पाणीसाठा शहरासह तालुक्यात आहे. येथील भौगोलिक रचना ही विशेष करून यासाठी कारणीभूत ठरत आहे. राज्यातील एकमेव फायद्यात चाललणारी पाणीपुरवठा योजना ही सावंतवाडीची आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतक पाणी सध्या उपलब्ध असून नागरीक, ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन शहर व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. 


शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे. जून अखेरपर्यंत पाणी पुरवठा होईल एवढं पाणी इथं उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमीच आहे. उन्हाळ्यात झपाट्याने पाणी पातळीत घट होत आहे. मात्र, पाळणेकोंड धरण अर्धे भरलेले आहे. त्यामुळे पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी आहे. परंतु, पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन शहर पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. तर ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी कालव्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. माडखोल, सांगेली, वाफोली येथील धरणांच्या माध्यमातून परिसरातील गावांना पाणीपुरवठा होतो. शितपवाडी, आरोस धनगरवाडी सारख्या दुर्गम भागात ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं जलजीवन योजनेतून विहीरींच्या माध्यमातून नळपाणी योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक विहीरी, वैयक्तिक विहीरी, हातपंप, दुहेरी पंपाच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे. जुन अखेरपर्यंत पुरेल एवढा साठा तालुक्यातील बहुतांश भागात शिल्लक असून ग्रामस्थांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं केलं आहे.



५६ कोटींची महत्वपूर्ण योजना !

सावंतवाडी शहरासाठी महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून ५६ कोटी १७ लाख रुपये इतका निधी मंजुर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला आहे. या योजनेमुळे संपूर्ण जलवाहिनी नव्याने बसवली जाणार आहे. प्रत्येक ग्राहकांच्या नळापर्यंत पाईपलाईन बदलली जाणार असून शहरात २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पही यामध्ये होणार आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी विशेष परिश्रम घेतले. 


एकमेव फायद्यातील योजना !

सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजना ही राज्यातील एकमेव फायद्यात चाललणारी योजना आहे. गुरूत्वाकर्षणावर आधारीत ही योजना आहे. तसेच केसरी गावच पाणी देखील या शहारात पुरवल जात. ही ऐतिहासिक नळपाणी योजना आहे जी गुरूत्वाकर्षणावर आधारित आहे. श्रीमंत राजेसाहेब रघुनाथ सावंत भोंसले यांच्या राणीसाहेब ताराबाबा यांच्यामुळे ही योजना शहराला मिळाली. १३० वर्षांपूर्वीच्या असलेल्या संस्थानकालीन नळ योजनेतून दिवसाला पाच लाख लिटर पाणीपुरवठा होतो. दरम्यान, शहरालगतच्या माजगाव गावात धरण प्रकल्प होत आहे. नुकतच त्याच भुमिपूजन झालं असून हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर लगतच्या गावांना देखील फायदेशीर असा ठरेल.


वाढती लोकसंख्या ठरतेय मुख्य प्रश्न !

शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. या ठिकाणी इमारतींची जाळी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातून शहरीभागाकडे येणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. याचा परिणाम पाण्याची गरज वाढून त्याचा तुटवडा भासत आहे. नळपाणी योजना जुनी असल्यानं मोठ्या इमारतीत पोचण्यास विलंब होत आहे. जीर्ण लाईन झाल्यानं पाणी गढूळ होत आहे‌. सद्यस्थितीत पाळणेकोंड धरण, संस्थानकालीन केसरी नळपाणी योजना वापरात आहेत.तर नरेंद्र डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यावरही नळपाणी योजना राबवली आहे. शहरात आज साडेतीन हजारांच्या दरम्यान नळ कनेक्शने आहेत. कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणावरून दिवसाला साधारणतः तीस लाख लिटर पाणीपुरवठा होतो. या धरणाची क्षमता १.०८५ द.ल.घ.मी इतकी आहे. या ठिकाणी २०१६ मध्ये तब्बल ९९ लाख रुपये खर्च करून गोडबोले गेट बांधण्यात आले आहे. त्याचा फायदा पाण्याचा साठा वाढविण्यासाठी झाला आहे.


मोती तलाव बजावतं महत्वाची भूमिका

शहराची भौगोलिक रचना यासाठी कारणीभूत ठरते. नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून पाणी शहरात साठण्यास मदत होते. त्यामुळेच येथील विहीरी शक्यतो तळ गाठत नाहीत. मात्र, नैसर्गिक स्त्रोतांच्या आड येणारा कॉक्रीट विकास आता मारक ठरत आहे. ऐतिहासिक मोती तलाव हा एक छोट्या धरणाचा प्रकार आहे. उंचावरील प्रदेश असल्यानं पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी मोती तलाव महत्वपूर्ण ठरते. शहरातील विहीरी, बोअरवेल यात जून अखेरपर्यंत पुरेल इतकं पाणी यामुळे राहतं. गेल्यावर्षी गाळ काढण्यासाठी मोती तलाव आटवल्यानं शहरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती. शक्यतो या भागात टॅंकरची आवश्यकता भासत नाही. ज्या ठिकाणी भासते तिथे न.प.च्या बंबाद्वारे पाणी पोहचवलं जातं.

पाणी पुरवठा आता सुरू आहे त्याप्रमाणेच जून अखेरपर्यंत होईल. धरणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.सावंतवाडी नगरपरिषद पाळणेकोंड धरणावरून सावंतवाडी शहरासह कोलगाव, कुणकेरी यासह परिसरातील गावांना पाणी पुरवठा आहे. तो सुरळीत चालू राहील अशी परिस्थिती सध्या आहे. पाळणेकोंड धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे. सध्या अर्धे धरण भरलेले आहे. धरणात १८ पैकी ९.६३ मीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात पाणी पुरवठा दैनंदिन होईल. परंतू, पाण्याचा वापर जपून करावा. 

: भाऊ भिसे, पाणी पुरवठा अभियंता, सावंतवाडी न.पं.


ग्रामीण भागात जुनं अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. ग्रामीण भागात ७१५ सार्वजनिक विहीरी, २३३ हातपंप, १०२ नळयोजना, १९ दुहेरी पंप यांच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातं. शितपवाडी, आरोस धनगरवाडी सारख्या दुर्गम भागात जलजीवन योजनेतून पाणी पुरवठा केला आहे. मुबलक असा पाणीसाठा असल्यानं ग्रामीण भागात आहे. मळगाव, नेमळे भागात थोडा त्रास आहे. पण, तिथे व्यक्तिगत विहीरी, बोअर अधिक प्रमाणात आहेत. पाणी टंचाई भासेल अशी परिस्थिती सध्यातरी नाही. परंतू, ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून करावा. 

सुदेश राणे, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा


५' X २' X २' मापाचा एक खड्डा पावसापूर्वी घराशेजारी खणल्यास त्यात २० घन फुट पाणी मावेल. याप्रमाणे जून ते सप्टेंबर- ऑक्टोबर या काळात किमान २० वेळा एक खड्डा पाण्याने पूर्ण भरून ते पाणी जमिनीत मुरविल्यास सुमारे ६०० घन फुट ते ४०० घन फुट पाणी एका खड्ड्यापासून जमिनीत मुरले जाईल. ही योजना सर्व स्तरावर राबविल्यास अब्जावधी घनफुट पाणी जमिनीत मुरवून भविष्य काळात सुजलाम् सुफलाम् भारत बनेल. हे पाणी मुरविणे म्हणजेच एक प्रकारे लहानसं धरणच तयार केल्यासारखे होईल‌. तेही फुकट, बिन खर्चिक. 

: प्रा. गिरीधर परांजपे, माजी प्राचार्य


ग्रामीण भाग 

सार्वजनिक विहीरी ७१५ 

हातपंप २३३

नळयोजना १०२ 

दुहेरी पंप १९ 

शहरी भाग 

सार्वजनिक विहीरी १५-२०

नळ कनेक्शन ३५००

दिवसाला पुरवठा ३० लाख लीटर