
देवगड : देवगड - जामसंडेचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अखेर या पाणीप्रश्नाबाबत देवगड जामसंडे शहरातील ग्रामस्थ एकवटले असून यावेळी प्रशासनावर ग्रामस्थानी चांगलाच संताप व्यक्त केला.
रविवारी पाणी प्रश्नाबाबत झालेल्या ग्रामस्थांचा बैठकीत नगरसेवक व नगरपंचायत प्रशासनावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाण्यासाठी आता उद्रेक करण्याची वेळ आली आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांमधून व्यक्त होत होत्या. नळपाणी योजना दुरूस्ती व सुधारणा कामाचे उद्घाटन होवून पाच महिने उलटले तरी कामाचा पत्ताच नाही उलट काम करण्याअगोदरच एका कार्यकर्त्याने ठेकेदाराकडून लाखो रूपये कमिशन घेतले असा गंभीर आरोपदेखील बैठकीत करण्यात आला. आता पाण्यासाठी निर्णायक लढाई ठेवली असून यासाठी सर्वांनी एकत्रित येवून समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही समिती स्थापन करण्यासाठी देवगड जामसंडेमधील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन या बेतकीच्या निमित्ताने करण्यात आले आहे.
देवगड जामसंडेचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाणीप्रश्नाचा पार्श्वभुमीवर देवगड जामसंडे ग्रामस्थांची बैठक रविवारी सायंकाळी मांजरेकर निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीत पाणीप्रश्नाबाबत विस्तृत चर्चा झाली. प्रत्येक निवडणुकीवेळी पाणीप्रश्न कायमचा सोडविणार असे आश्वासन लोकप्रतिनिधीं कडून दिले जाते. मात्र त्या आश्वासनाची पुर्तता काही झाली नाही. देवगड जामसंडे शहरासाठी दहिबांव नळयोजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र योजनेची पाईपलाईन वरचेवर फुटत असून यामुळे पाणीपुरवठाही वारंवार बंद पडतो व पाण्याचा प्रश्न गंभीर होता यासाठी 9 कोटी 21 लाख रूपये निधी मंजुर करून नळपाणी योजना दुरूस्ती व सुधारणा या कामाचे उद्घाटन जुलै महिन्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात मात्र कामाचा अद्याप पत्ताच नाही उलट कामाच्या अगोदरच ठेकेदाराकडून लाखो रूपयांचे कमिशन घेवून एक कार्यकर्ता मात्र मोकळे झाले आहेत असा गंभीर आरोप देखील या वेळी या बैठकीत करण्यात आला.
पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत नगरसेवक व नगरपंचायत प्रशासनालाही गांभीर्य नाही. यासाठी नगरपंचायतीवर ग्रामस्थांचा मोर्चा काढणे गरजेचे आहे असे मत प्रफुल्ल कणेरकर यांनी व्यक्त केले. तर गुरूदेव परूळेकर यांनी पाणी या प्रश्नासाठी आता अॅक्शन प्लॅन ठरवावा लागेल याकरीता देवगड जामसंडेमधील ग्रामस्थांची बैठक घेवून एक समन्वय समिती स्थापन करावी व या समितीच्या माध्यमातूनच पाणीप्रश्नासाठी दीर्घकालीन लढा द्यावा लागेल असे मत मांडले. मात्र हा लढा सनदशीर मार्गाने द्यावा लागेल असे मत निशिकांत साटम यांनी मांडले. पाणीप्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. नुसती आश्वासने देवून पाणीप्रश्न सुटेल ही आशा संपली आहे. कारण गेली 10 वर्षे लोकप्रतिनिधी, प्रशासन ही केवळ साचेबध्द उत्तरे देत आहेत असे मत शामल जोशी यांनी व्यक्त केले. तर रस्ते व गार्डन या विकासकामांमधून मोठ्या प्रमाणात कमिशन मिळते यामुळे या कामाच्या मागावर नगरसेवक असतात असा आरोप यावेळी करण्यात आला.
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रथम सर्व माहिती घेवून नंतर त्याबाबत तहसिलदार, प्रातांधिकारी आदी प्रशासनातील प्रमुख अधिकाèयांची स्थापन केलेल्या समन्वय समितीच्या माध्यमातून भेट घेवून त्यांना निवेदन देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पाणीप्रश्न हा गंभीर विषय असून आता सर्व ग्रामस्थांचीच बैठक घेवून प्रत्येक प्रभागातून दोन-दोन सभासद या समितीत घ्यावे असे ठरले. समन्वय समिती स्थापन करण्यासाठी देवगड जामसंडेमधील ग्रामस्थांची बैठक 25 डिसेंबर रोजी देवगड सातपायरी येथील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी 25 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या ग्रामस्थांचा बैठकीला देवगड जामसंडेमधील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत निशिकांत साटम, बाळा लळीत, नंदकिशोर भाबल, सुधीर मांजरेकर, प्रदीप कणेरकर, रविकांत चांदोस्कर, शामल जोशी,चारूदत्त सोमण आदींनी मते मांडली.या बैठकीला निशिकांत साटम, सुधीर मांजरेकर, सौ.शामल जोशी, गुरूदेव परूळेकर, चारूदत्त सोमण, सुरेश सोनटक्के, प्रफुल्ल कणेरकर, रविकांत चांदोस्कर, लहरीकांत पटेल,गुरूनाथ वाडेकर, धर्मराज जोशी, प्रदीप कणेरकर, शराफत खान, नासीर शेख, अजिज खान, प्रदोष कोयंडे, सत्यवान मणचेकर, नंदकिशोर भाबल, बाळा लळीत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.












