कृषी अधीक्षकांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 28, 2025 19:37 PM
views 83  views

कुडाळ :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा व काजू पीकाचा विमा हाप्ता विमाकंपनीने दिलेल्या वेळेत भरला. परंतु विमा कंपनीने गेल्यावर्षीची आंबा व काजू पीक विम्याची रक्कम अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. नोव्हेंबर महिन्यापासून नवीन वर्षासाठी पीक विमा उतरविण्यास सुरुवात होणार आहे. मात्र विमाकंपनीकडून अगोदरचीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे प्रशासनाला व विमा कंपनीला जाग करण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग नगरी येथे कृषी अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा आंबा बागायतदार विजय प्रभू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. 

जिल्ह्यातील सर्व शेतकरी व आंबागायदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा व काजू पीकाचा विमा विमाकंपनीने दिलेल्या वेळेत उतरविला होता. परंतु विमा कंपनीने गेल्यावर्षीची आंबा व काजू पीक विम्याची रक्कम अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. शेतकऱ्यांनी आंबा व काजू पिकाचा विमा उतरविल्यानंतर शेतकऱ्यांना निर्धारीत कालावधीत नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असते. मात्र गेली काही वर्षे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्ग नुकसान भरपाई मिळण्यास मोठा विलंब होत आहे.

गेल्या दोन वर्षापासून ही रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी पीक विमा हाप्ता भरावा लागणार आहे. विमाकंपनीकडून अगोदरचीच रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. 2022 सालचे काजूचे विम्याचे पैसे सुद्धा राज्य शासनाच्या कमिटीने शेतकऱ्यांना 21 हजार हेक्टरी देण्याचे आदेश एका कंपनीला निर्गमित केले आहेत.परंतु अजून पर्यंत विमा कंपनी शासनाच्या आदेशाला दात देत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाला व विमा कंपनीला जाग करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग नगरी कृषी अधीक्षक कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभू यांनी केले आहे.