
सिंधुदुर्गनगरी : शिधापत्रिका धारकांना धान्य वितरण करताना ई पॉस मशीनला येत असलेल्या एरर मुळे अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. तरी ३० एप्रिल २०२५ पर्यंत यामध्ये सुधार न झाल्यास १ मे २०२५ रोजी सर्व ई पॉस मशीन कुडाळ तहसील कार्यालयात जमा करण्याचा इशारा कुडाळ तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेचे अध्यक्ष उमेश धुरी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ऑल महाराष्ट्र फेयर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन पुणे संलग्न रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटना तालुका कुडाळच्या वतीने आज जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाभार्थी शिधापत्रिका धारकांना ईपॉस मशीन द्वारे दरमहा धान्य वितरण करण्यात येते. मात्र धान्य वितरण करताना एन आय सी व ओयासीस च्या माध्यमातून वेगवेगळे एरर येत आहेत. मशीन लॉग आऊट होणे, मशीनला धान्य झीरो दाखवणे, प्रत्येक दुकानात वेगवेगळे एरर येणे, अशा प्रकारचे वेगवेगळे मशीनला सातत्याने येत आहेत. संबंधित समस्येबाबत शासकीय ग्रुप वर माहिती दिली असता समर्पक उत्तरे मिळत नाहीत.
त्यामुळे लाभार्थ्यांना तासनतास धान्यासाठी ताटकळत राहावे लागते व दिवसा अखेर विना धान्याचे परत जावे लागते. अशामुळे शिधापत्रिकाधारक व परवानाधारक यांच्यात वाद होण्याचे प्रसंग उद्भवतात. गेले कित्येक महिने या संदर्भात वरिष्ठ पातळीवर कळवून सुद्धा याबाबत काहीही उपाययोजना केलेली दिसत नाही. दरमहा याच समस्या येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन धान्य वितरण करणे अवघड बनले आहे. परवानाधारकाची काही चूक नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तरी याबाबत ३० एप्रिल २०२५ पर्यंत समस्यांमध्ये सुधारणा न झाल्यास १ मे २०२५ रोजी सर्व ईपास मशीन कुडाळ तहसीलदार कार्यालयात जमा कराव्या लागतील असा इशारा कुडाळ तालुका सर्व रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अध्यक्ष उमेश धुरी व सचिव संतोष सावंत यांनी दिला आहे.