
सावंतवाडी : न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ७ ऑगस्ट २०२५ पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. २१ ऑक्टोबर २०२१ पासून केलेल्या तक्रारीवर साडेतीन वर्षांनंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
श्री. बरेगार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. यानंतर ३ उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कुडाळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. मात्र, ही चौकशी केवळ औपचारिकता ठरली असून कोणतीही कारवाई झाली नाही.
बरेगार यांनी यापूर्वी तीन वेळा उपोषण केले आहे. प्रत्येक उपोषणानंतर चौकशी अधिकारी बदलून चौकशीचा फार्स केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ३० एप्रिल २०२४ रोजी सादर झालेल्या अहवालावरही कोणतीही कारवाई झाली नाही. या संदर्भात त्यांनी कार्यालयाला तीन स्मरणपत्रेही पाठवली होती.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत त्यांनी १३ जून २०२५ रोजी केलेल्या अर्जावर, कार्यालयाने "कार्यवाही चालू असून माहिती नंतर दिली जाईल," असे उत्तर दिले. या उत्तराला त्यांनी "ज्येष्ठ नागरिकाची क्रूर चेष्टा" केल्याचे म्हटले आहे. "गतिमान शासन, झिरो पेंडन्सी" या धोरणाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे श्री. बरेगार यांनी ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, ७ ऑगस्ट २०२५ पासून कारवाई पूर्ण होईपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.