पद मिळाले म्हणून गरळ ओकाल तर वारकरी संप्रदाय कधीही सहन करणार नाही

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांचा इशारा
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 17, 2022 12:45 PM
views 294  views

सिंधुदुर्ग :श्रीमती सुषमा अंधारे यांनी स्वतःला शिवसेनेच्या उपनेत्या म्हणवून घेण्यापूर्वी महाराष्ट्राची संस्कृती आणि संतांचा अभ्यास करावा. संत विचार आत्मसात करूनच भाषणे द्यावीत.संत महंतांची टिंगल टवाळी करणे म्हणजे पक्षाचे नेतृत्व करणे नव्हे. वारकरी संप्रदाय आणि वारीचे महत्त्व प्रथमतः जाणून घ्या आणि नंतरच भाषणात संतांचे दाखले द्या. पद मिळाले म्हणून वाटेल ती गरळ ओकाल तर वारकरी संप्रदाय कधीही असे विधान आणि कृत्य सहन करणार नाही असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी दिला आहे. शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज त्याचप्रमाणे वारकऱ्यांवर कीर्तनकारांनी केलेल्या टीकेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने गंभीर दखल घेत अंधारे यांनी वारीचा अभ्यास करावा संतांच्या विचारांचा अभ्यास करावा असा सल्ला दिला आहे.


ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज म्हणाले,वारकरी संप्रदाय कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला बांधला गेलेला नाही मात्र त्या पक्षांनी संप्रदायाचा आणि संतांचा आदर ठेवला पाहिजे. वारकरी संप्रदाय ची परंपरा अंधारे यांना माहित नाही. भगवान शंकर यांच्या पासून वारकरी संप्रदाय ची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली या महाविष्णू चा अवतार आहेत. जड मूड उद्धरिले, रेड्या मुखी वेद बोलविले हा अभांग संत नामदेवराय यांच्या मुलाचा नारा महाराज यांनी लिहिला. त्या वचनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. एकनाथ महाराज तुपाची वाटी घेऊन कुत्राच्या पाठी लागले अंधारे बाई म्हणतात परंतु संत नामदेवराय हे तुपाची वाटी घेऊन कुत्रा च्या पाठी लागले होते कारण ज्या वेळी त्याच्या वर श्रीगुरु कृपा झाली त्या वेळी त्याना सर्वत्र पांडुरंग परमात्मा दिसत होता. म्हणून कुत्रा ला जर कोरडी रोटी दिली तर त्याला त्रास होईल म्हणून तुपाची वाटी घेऊन रोटीला तूप लावण्या साठी कुत्र्या च्या मागे नामदेव राय लागले होते. एवढी करुणा त्यांना प्रत्येक जीवाबद्दल होती. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी प्रथमतः महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा असलेल्या वारकरी संप्रदायाचा आणि संतांचा अभ्यास करावा आणि नंतरच त्यांच्याबद्दल बोलावे. असा इशाराच वारकरी संप्रदायाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी दिला आहे .