
दोडामार्ग : आषाढी एकादशीनिमित्त समस्त वारकरी संप्रदाय विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारीने पंढपूरला जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र आज शनिवारी पहिल्या दिवशी मुळगाव गोवा येथून निघालेल्या शंकर काळू गाड ( वय – ७४, रा. मुळगाव – शिवोलकरवाडा, गोवा ) यांच्यावर काळाने घाला घातला असून आंबेली नूतनवाडी येथे पोहचले असता हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळगाव गोवा येथून गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी वारीने जातात. शंकर काळू गाड हेही गेल्या १५ वर्षांपासून पंढरपूरला पायी वारीने जातात. मात्र यंदा ते सकाळी ९.३० वाजता निघाले असून संध्याकाळी ६ वाजता आंबेली नूतनवाडी येथे पोहचले असता त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. वारीतील सहभागी असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे डॉ. निलेश वरवटकर यांनी सांगितले. गाड हे गोवा पोलिस खात्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. पायी वारीमध्ये त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने वारीतील अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना असा परिवार आहे.