
चिपळूण : कर्करोगाच्या प्रत्येक रुग्णाच्या घरानजीक उपचार केंद्र उभे करणे हे आमचे उद्दिष्ट आणि ध्येय आहे.हेच ध्येय डेरवणमध्ये साकारताना वालावलकर रुग्णालय आणि टाटा मेमोरियल यांच्यामधील जोडणाऱ्या नाळेचा भूमिका डॉ.श्रीपाद बाणावली बजावत आहेत, असे प्रतिपादन टाटा मेमोरियल हॉस्पिटल चे संचालक डॉ.सुदीप गुप्ता यांनी केले. चिपळूण तालुक्यातील डेरवण ( सावर्डे) येथील वालावलकर रुग्णालयात उभारण्यात आलेल्या न्यूक्लियर मेडिसिन सेंटर च्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, गेले २४ तास माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचे, समाधानाचे आणि महत्वाचे होते. कारण डेरवण मधील नवीन नुक्लिअर मेडिसिन सेंटर सुविधेमुळे ग्रामीण लोकांचे जीवनमान लक्षणीयरित्या सुधारेल. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणायचे, 'आपले काम तोपर्यंत संपत नाही, जो पर्यंत आपण प्रत्येकाचे दुःख निवारण करित नाही.आपल्या देशाचे पंतप्रधान दृष्टिकोनातील विकसित राष्ट्र घडविण्यासाठी प्रगती, उत्तम आरोग्य सुविधा, मातृदरात घट आणि चांगल्या रोजगाराच्या संधी यावर विशेष भर दिला पाहिजे. श्री गुप्ता यांनी श्री.काकामहाराज , विकास वालावलकर आणि डॉ. श्रीपाद बाणावली यांचे आभार मानून संस्थेच्या माहितीपर सादरीकरणाचे कौतुक केले.
“खरा विकास हा दुर्गम भागातील वंचित लोकांचे कल्याण आणि त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव टाकण्याच्या क्षमतेवरून मोजला जातो.” आणि अगदी हेच साध्य करण्यासाठी भक्त श्रेष्ठ कमलकरपंत लक्ष्मण वालावलकर हॉस्पिटलने विडा उचलला आहे.त्याकरता कोकणात एकमेव असे कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर उपचार युनिट , अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि हॉलसियन लिनियर एक्सीलरेटर आणि सीटी सिम्युलेटरसह रेडिएशन विभाग सुसज्ज केला आहे.आणि हे उपचार लोकांना परवडतील अशा दरात उपलब्ध केलेत.