जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान | जिल्हा प्रशासन सज्ज

Edited by:
Published on: March 16, 2024 14:22 PM
views 193  views

सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार असून या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे,निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते.

तावडे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण मतदार 657,780 असून कणकवली विधानसभा मतदारसंघात दोन लाख 25 हजार 588 मतदार कुडाळ विधानसभा मतदारसंघात दोन लाख दहा हजार 378 मतदार तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 21 हजार 814 मतदार आहेत. 18 ते 19 वयाचे मतदार 5759 असून दिव्यांग मतदार 7565 आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण मतदान केंद्र 918 असून त्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघात 332, कुडाळ विधानसभा मतदारसंघात 278 तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 308 मतदान केंद्र असतील.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूणच 85 पेक्षा जास्ती वय असलेले मतदार कणकवली विधानसभा मतदारसंघात 4561 आहेत, कुडाळ विधानसभा मतदारसंघात 4914 आहेत,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 3674 आहेत.या मतदारांना जर मतदान केंद्रावरती येणे शक्य नसेल तर नामनिर्देशन पत्र भरण्यापूर्वी त्यांना एक अर्ज भरून देणे आवश्यक आहे,जेणेकरून त्यांना आपल्या घरातून मतदान करता येईल असेही ते यावेळी म्हणाले. आचारसंहिता लागू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी राजकीय पक्षांचे बोर्ड, बॅनर,फलक लागले असतील ते 24 तासाच्या आत काढण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेले आहेत असेही तावडे म्हणाले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदूक परवानाधारक यांना आपल शस्त्र जमा करून देण्यासाठी देखील सुचित करण्यात आले असून शासकीय विश्रामगृहांचा वापर हा राजकीय राजकीय पक्षाच्या बैठकीसाठी होता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.

 यापुढील कालावधी हा सणांचा कालावधी आहे यामध्ये रामनवमी गुढीपाडवा शिंगोत्सव रमजान ईद आधी सणांचा समावेश आहे अशावेळी त्या कार्यक्रमांमध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले