
दोडामार्ग : रविवारी १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या दोडामार्ग तालुक्यातील ग्रा. पं. सार्वत्रिक निवडणूकीसाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष - 74, पहिला मतदान अधिकारी - 74, इतर मतदान अधिकारी 1 -74, इतर मतदान अधिकारी 2- 74, पोलिस - 74, शिपाई - 74 अशी 373 जणांची टीम तैनात करण्यात आलीय.
दोडामार्ग तालुक्यात एकूण 28 पैकी 3 ग्रा. पं. पूर्णतः बिनविरोध ठरल्याने या 25 ग्रा. पं. साठी मतदान होणार आहे. त्यात २२ सरपंच पदासाठी तर २४ ग्रामपंचायत मध्ये सदस्यांसाठी निवडणूका होणाऱ आहेत. सर्व गावांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असून 6 वरिष्ठ अधिकारी, 58 पोलीस कर्मचारी, 27 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. खास दोडामार्ग तालुक्यासाठी पालघर येथून 33 पोलीसांचे पथक दाखल झाले आहेत. तर महसूल विभागाकडून एकूण 296 प्रत्यक्ष केंद्रावर व राखीव म्हणून 23 असे एकूण 319 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील 28 ग्रा. पं. च्या निवडणुका होऊ घातलेल्या होत्या. त्यापैकी विर्डी, केर, मोर्ले या गावाच्या ग्रा. पं. पूर्णतः बिनविरोध निवडीच्या ठरल्या आहेत. तर मणेरी येथील सरपंच पदही बिनविरोध ठरले. फुकेरीचे सरपंच पद आरक्षणनिहाय उमेदवाराअभावी रिक्तच राहिले आहे. त्यामुळे आता उर्वरित 23 ग्रा. पं. च्या थेट सरपंच पदाच्या निवडणूक होणार आहेत. तर घोडगेवाडी गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाल्याने आता उर्वरित ग्रा. पं. सदस्य पदासाठी निवडणूका होतील.
एकूण 25 ग्रा. पं. च्या निवडणुकीकरीता तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य, तसेच अन्य सर्व विभागातील मिळून एकूण 319 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस यंत्रणाही निवडणुक काळात बंदोबस्तासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोडामार्ग पोलिसांच्या दिमतीला पालघर जिल्ह्यातील 33 पोलीस कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. तसेच राज्य परिवहन मंडळाच्या 5 एसटी बसेस देखील मतदान यंत्रे, कर्मचारी अन्य साहित्य यांची ने - आण करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. शनिवारी सकाळपासून दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात सर्व अधिकारी , कर्मचारी मतदान यंत्रे तसेच अन्य साहित्य नेण्यासाठी दाखल झाले होते. साहित्याचे वाटप झाल्यावर मतदान यंत्रासह कर्मचारी, अधिकारी ७४ मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.