कणकवली न.पं.च्यावतीने मतदान जनजागृती !

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 24, 2024 10:07 AM
views 63  views

कणकवली : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने केंदीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कणकवली शहरात नगरपंचायत तर्फे मतदारांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे.

स्विप कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत   मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये 10 एप्रिल ते 19 एप्रिल या दरम्यान मतदार सेल्फी पॉईंट हा उपक्रम, मतदार हस्ताक्षर अभियान शहरामध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आले आहेत. सदर जनजागृती कार्यक्रमाकरीता बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शविला असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

 कणकवली नगरपंचायत कार्यालय, पटवर्धन चौक, पटकीदेवी मंदिर नजिक बाजारपेठ, प्रांत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस.टी.स्टँण्ड, पोदार इंटरनॅशनल स्कूल, टेंबवाडी व कणकवली कॉलेज अशा शहरातील विविध ठिकाणी मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आले आहेत. सदर ठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. शहरात रेल्वे स्टेशन जवळ, आप्पासाहेब पटवर्धन चौक, श्रीधर नाईक पुतळ्या जवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली कॉलेज, बस स्टँण्ड जवळ, बांधकरवाडी बसा स्टॉप जवळ, पटकीदेवी मंदिर जवळ व गांगोमंदिर जवळ या ठिकाणी बॅनर उभारून देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.

 दि.22/04/2024 रोजी आप्पासाहेब पटवर्धन चौक, बस स्टँण्ड जवळ, कणकवली कॉलेज व झेंडा चौक येथे पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. सदर जनजागृती कार्यक्रमाकरीता शालेय विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शवून पथनाट्याला चांगला प्रतिसाद दिला तसेच मानवी शृंखला, लोकशाही दंडी, मतदान जनजागृती संदेश देणारी रांगोळी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येणार आहे. नगरपंचायतीतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन दि.07 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांनी केले आहे.