
मंडणगड : ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलच्यावतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीची परंपरा कायम ठेवत भक्तीमय वातावरणात दिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रशालेच्यावतीने संपुर्ण शहरातून दिंडी काढण्यात आली. यावेळी विठ्ठल रखुमाई, थोर संतांची रूपे बालकांनी धारण केली होती. तसेच पालखी घेऊन विठुनामाचा गजर करीत विद्यार्थी तल्लीन होऊन दिंडीमध्ये रममाण झाले होते.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती व अनुभव मिळण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सर्व जाती धर्माचे आजी माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. प्रशाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख त्रिवेणी मर्चंडे यांनी त्यांच्या सहकारी पूनम स्वामी, सोनाली मर्चंडे, समृद्धी पंदिरकर,प्राजक्ता पारेख, सिद्धी गावडे, विशाल महाडिक यांच्यासह नेटके नियोजन केले होते. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा चारुलता पारेख, कार्यालय कर्मचारी नितीन दिवेकर यांच्यासह पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.