पुरातत्व विभाग महासंचालकांची विजयदुर्ग किल्ल्यास भेट

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 16, 2024 14:39 PM
views 56  views

देवगड :  जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले विजयदुर्ग आणि किल्ले सिंधुदुर्ग या दुर्गाचे नामांकन झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली येथून अतिरिक्त महासंचालक जान्हवीज शर्मा विजयदुर्गास दिनांक १६ मार्च रोजी दुपारी १२:०० वाजता भेट दिली. त्यांच्यासमवेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, मुंबई सर्कलचे सुपेरिंटेंडंट शुभ मुजुमदार, विजयदुर्ग सब सर्कलचे अधिकारी राजन दिवेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे पथक होते. दि. १६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली असून, दि. १७ रोजी सदर पथक सिंधुदुर्ग किल्ल्यास भेट देऊन पाहणी करणार आहे. किल्ले विजयदुर्ग आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने या पथकाचे या वेळी स्वागत करण्यात आले.

किल्ले विजयदुर्गाचे संवर्धन करताना आपल्या समितीचे सहकार्य नक्कीच घेतले जाईल. आपल्यासारख्या निस्पृह कार्य करणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसास्थळांविषयी प्रेम असणाऱ्या आपल्या समितीचा या कामात अंतर्भाव केला जाईल अशी ग्वाही भारतीय पुरातत्व विभागाचे सहाय्यक महासंचालक श्री. जान्हवीज शर्मा यांनी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या सदस्यांशी बोलताना दिली.

समितीचे उपाध्यक्ष श्री. शरद डोंगरे यांनी श्री. शर्मा यांचे नॅपकीन बुके देवून स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांनी विजयदुर्गाच्या दक्षिणेकडे असलेल्या बुरुज आणि तटबंदीच्या अंदाजपत्रकाच्या मागणीचीही पूर्तता तातडीने करण्याचे श्री. शर्मा आश्वासन दिले.

 जान्हवीज शर्मा यांच्यासह पुरातत्व विभाग नवी दिल्लीचे सहाय्यक स्थापत्यतज्ञ श्री. प्रियंक गुप्ता, जागतिक वारसास्थळाच्या सल्लागार स्नेहा बोराटे, मुंबई विभागाचे अधीक्षक शुभ मुजुमदार, विजयदुर्ग उपविभागाचे अधीक्षक राजन दिवेकर उपस्थित होते. यावेळी विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर, सचिव बाळा कदम, प्रदीप साखरकर, गणेश मिठबावकर, माजी उपसरपंच महेश बिडये यांनी चर्चेत सहभाग घेतला.