विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र भूमिपूजन सोहळा..!

जिल्ह्यात अधिक कुशल कारागिर निर्माण व्हावेत-पालकमंत्री रविंद्र चव्हाण
Edited by:
Published on: September 18, 2023 18:12 PM
views 104  views

सिंधुदुर्ग : विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गुणवंत, किर्तीवंत, कुशल कारागिर घडवले जाणार असल्याने युवकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे.  विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक कुशल कारागिर निर्माण व्हावेत असे मत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. 

न्यू इंग्लिश स्कूल ओरोस, येथे 'पंतप्रधान विश्वकर्मा'  योजनेच्या अंतर्गत विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, तहसिलदार अमोल पाठक, सरपंच परशुराम परब, प्रभाकर सावंत, डॉ. देवधर, श्री. बनसोडे, श्री. पालटकर, भाई सावंत, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, आजच्या तरुण पिढीला व्यसनापासून कसे रोखता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उद्योग तसेच व्यवसाय करताना  अद्ययावत  उपकरण व मशिनरी वापरने आवश्यक आहे. कौशल्य विकास केंद्रे उभी करुन चालणार नाही तर त्यासाठी अनेकांनी पाठबळ देण्याची गरज आहे.  जेणेकरुन नवीन पिढीला त्याचा पुरेपूर फायदा होईल. ज्या समाजातून आपण घडलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही जाणीव नेहमी असू द्यावी. आपण आज या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो याचा मला आनंद आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राकरीता  कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व cause to connect  या सहयोगी संस्थेचा समावेश असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविक प्रभाकर सावंत यांनी केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, डॉ. बनसोडे व श्री. देवधर यांनी मनोगत व्यक्त केले.