
सावंतवाडी : वादळी पावसात कोसळलेले वडाचे झाड अंगावर पडल्याने सायली धुरी हिचा झालेला दुर्दैवी मृत्यू अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. धुरी परिवारावर अचानक ओढवलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशा शब्दात विशाल परब यांनी धुरी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. आज धुरी यांच्या घरी भेट देत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी त्यांना धीर दिला.
सावंतवाडी तळवडे येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या सायली सतीश धुरी या विद्यार्थिनीचा महाविद्यालयातून घरी परतताना वडाचे झाड अंगावरती पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने तळवडे परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. ही घटना समजताच विशाल परब यांनी तातडीने धुरी परिवाराची भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासमवेत पंकज पेडणेकर, बाळा जाधव, रवींद्र परब, सुशांत गावडे, नीलकंठ नागडे, नागेश कोरगांवकर यांनीही धुरी परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा कार्यक्षम नसल्याने या मुलीच्या नातेवाईकांना यावेळी जो त्रास झाला त्याने आपण व्यथित झालो आहोत. सर्वसामान्य नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधांबाबतची ही अनास्था अत्यंत खेदकारक असल्याचेही विशाल परब यांनी म्हटले आहे. हा दुर्दैवी प्रसंग आज कसल्याही टिकाटिपणीचा नसला तरीही सावंतवाडीकरांसाठी ही बाब निश्चितपणे संतापजनक अशी आहे. याबाबत आपण आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे लक्ष वेधून इथली दारुण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणणार आहोत असेही ते म्हणाले.