विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले काव्य पुरस्कार सरिता पवार यांना

Edited by: भगवान शेलटे
Published on: November 11, 2024 20:41 PM
views 119  views

कणकवली : विनोदिनी  आत्माराम  जाधव  फाउंडेशन वेंगुर्ले चा  क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले  राज्यस्तरीय  काव्यपुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संयत विद्रोही कवयित्री सरिता पवार व ठाणे येथील कवी गीतेश शिंदे  यांना  जाहिर करण्यात आला आहे. 

विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुर्ले तर्फे कालकथित  विनोदिनी आत्माराम जाधव यांच्या स्मरणार्थ  देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार सन 2022 -2023 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार  यांच्या ' राखायला हवी निजखूण '  या बहुचर्चित  काव्यसंग्रहाला  तर सन 2023-2024 साठीचा  पुरस्कार  ठाणे  येथील कवी गीतेश  गजानन शिंदे  यांच्या ' सीसीटीव्हींच्या गर्द  छायेत ' या आशयघन  काव्यसंग्रहाला  जाहिर  झाला आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रु.3000, शाल,सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

'राखायला हवी निजखूण' या काव्यसंग्रहातील  सरिता पवार यांची कविता स्त्रीजाणीवविश्वाचे संवेदन व्यक्त  करणारी आहे. या संग्रहातील  स्त्रीची प्रतिमा स्वयंसिद्धा रुपात उतरते. त्यामुळे पारंपरिक  संकेतांचा  पोकळपणा निर्भीडपणे व्यक्त करते. ती मनुवादी संस्कृतीला नकार देवून  नवे आधुनिक जाणिवेचे समतावादी  भावसंवेदन  प्रकट करते. स्त्रीला  तिच्या सन्माना पर्यंत  घेऊन येणार्‍या  सावित्रीबाई फूले यांच्या विषयीचा कृतज्ञता भाव त्यांच्या कवितेतून व्यक्त होतो. समष्ठीशी  आणि स्त्रीविषयी बांधिलकी सांगण्याचा सूर हा या कवितेचा प्राण  आहे.आपल्या अवतीभोवतीच्या  स्त्रियांची सुखदुःखे, त्यांची जगण्याची काहिली  या कवितांमधून  व्यक्त होते. या कवितेतील स्त्री  समाजसंस्कृतीतील  दमणकारी व्यवस्थेला  प्रश्नांकित करुन  स्त्रीमुक्तीचा  मार्गावर आरूढ  होते,हे या कवितेचे बलस्थान आहे

'सीसीटीव्हींच्या गर्द छायेत ' हा कवी गीतेश गजानन शिंदे  यांचा काव्यसंग्रह समकालीन यांत्रिकता  आणि यांत्रिकीकरण माणसाच्या संवेदनशीलतेवर  केलेल्या आक्रमणाचा  आलेख मांडतो. समकालात  या  यंत्रकालाने ,यंत्र संस्कृतीने  मानवी जीवनालाही  यांत्रिकीकरण स्वरूप दिले. आभासी  जगाने माणसाच्या  संवेदनशीलतेचा ताबा घेतला, या विषयी ही कविता भाष्य करते. महानगरीय जीवनाने  परस्परातील बंधुभाव, विश्वास  संपुर्ण नष्ट केला,याचाही संदर्भ या कवितेला आहे. भाषा आणि भावना  रक्तबंबाळ झालेल्या जगाचे  हे  संवेदन आहे.

या पुरस्काराची घोषणा विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील  आत्माराम जाधव तसेच प्रसंवाद चे संपादक इंजि.अनिल जाधव यांनी केले आहे.  सदर  पुरस्काराचे  वितरण  वेंगुर्ले   येथे डिसेंबर 2024 मध्ये विशेष  समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत  प्रदान केले  जाणार आहेत.

या पुरस्काराची निवड जेष्ठ कवी व समीक्षक डॉ. गोविंद काजरेकर,  सुप्रसिद्ध कवयित्री व कथाकार संध्या तांबे व प्रसंवाद चे संपादक तथा सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग चे अध्यक्ष इंजि.अनिल जाधव यांच्या निवड समितीने केली आहे.

विनोदिनी फाउंडेशन चे पुरस्कार यापुर्वी डॉ.योगिनी सातारकर -पांडे(नांदेड),डॉ. मच्छिंद्र चोरमारे(नागपूर),डॉ.प्रकाश  मोगले(नांदेड), मोहन शिरसाट (वाशीम),कल्याण  श्रावस्ती(सोलापूर),बुद्धभुषण साळवे(नाशिक),सिद्धार्थ  तांबे(सिंधुदुर्ग)या मान्यवर कवीना प्राप्त झालेले आहेत . विनोदिनी फाउंडेशन चा क्रांतीजयोती राज्यस्तरीय पुरस्कार  प्राप्त झाल्याबद्दल सरिता पवार व गीतेश  शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.