
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे अडचणीत आले आहेत. तावडेंनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये रोखून धरलं आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेराव घेतला आहे.
विनोद तावडे यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत ५ कोटी रुपये सापडल्याचा आरोप हितेंद्र ठाकूरांनी केला आहे. तावडे यांच्याकडे सापडलेल्या काही डायऱ्यांमध्ये पैशांच्या नोंदी आहेत. तो आकडा १५ कोटी रुपयांच्या घरात जातो, असा ठाकूर यांचा दावा आहे. वसई रोड ५, विरार पश्चिम ४ आणि नालासोपारा ५ अशा नोंदी ठाकूर यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवल्या आहेत.
विनोद तावडेंनी ५ कोटी रुपये वाटले. त्यांच्याकडे असलेल्या डायऱ्यांमध्ये १५ कोटींची नोंद आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडल्यानंतर तावडेंचे मला २५ फोन आले. हवं तर माझे कॉल रेकॉर्ड तपासा. माझी चूक झाली. मला जाऊ द्या, अशा शब्दांत त्यांनी माझ्याकडे गयावया केली, असा सनसनाटी दावा ठाकूरांनी केला. मतदानाच्या ४८ तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, इतकी साधी गोष्ट तावडेंसारख्या मोठ्या नेत्याला समजत नाही का, असा सवाल त्यांनी केला.
भाजपमधल्या काही जणांनीच मला तावडे पैसे वाटण्यास येणार असल्याची माहिती दिली होती, असा खळबळजनक दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.