
कणकवली : ओसरगाव येथे महामार्गावर संशयास्पद स्थितीत वावरणाºया तीन युवकांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलीस चौकशीत सदर युवक चोरटे नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी युवकांना सोडुन दिले.
कणकवली शहर व परिसरात मागील काही दिवसांमध्ये छोट्या-मोठया घरफोडया, चोºया झाल्या आहेत. काही दिवसापूर्वीच कलमठ येथे चोरटयांनी चार बंगले फोडून जवळपास २ लाखांचा मुद्देमाल चोरला होता. चोरटे अद्यापही पोलीसांना सापडू शकलेले नाहीत. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील ओसरगाव येथील असरोंडी फाटा येथे तीन युवक संशयास्पद स्थितीत फीरताना आढळले. याबाबतची माहिती समजताच ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे, अक्षय राणे आदींसह ग्रामस्थांनी धाव घेतली. युवकांकडून विसंगत माहीती प्राप्त होत असल्याने ग्रामस्थांनी पोलीसांना बोलावुन घेतले. पोलीसांनी तीनही युवकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशी अंती सदरचे युवक काहीसे विमनस्क स्थितीतील असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी युवकांना सोडून दिल्याने घडल्या प्रकाराची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.