
कणकवली : विकासापासून वंचित राहिलेल्या बावशी गावच्या ४ कि.मी. रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. सध्या दुचाकी वाहन चालविण्यासही अडथळा ठरणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बावशी गावच्या तिरंगा ग्रामसंघातर्फे २ मार्च रोजी स. ८ वा. तोंडवली- बावशी फाटा येथे बावशी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती बावशी तिरंगा ग्रामसंघाच्या विद्यमान अध्यक्षा सुप्रिया खडपे आणि त्यांच्या सहकार्याने दिली आहे.
सदर आंदोलनासाठी बावशी गावच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील माहितीचे निवेदन जि. प. बांधकाम विभाग, कणकवली प्रांताधिकारी, कणकवली तहसीलदार, कणकवली पोलीस स्टेशन, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव तसेच इतर राजकीय नेत्यांनाही देण्यात आले असल्याचीही माहिती श्रीमती खडपे यांनी दिली.
कणकवली तालुक्यातील बावशी गाव हा विकसनशील गाव म्हणून ओळखला जातो. नांदगाव पासून ७ किमी. अंतरावर असलेल्या या गावचा तोंडवली ते बावशी गावठाण हा ४ कि.मी. रस्ता पूर्णत: नादुरुस्त झाला आहे. या रस्त्याची चाळण झाली असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यावर्षी चार चाकी, दुचाकी वाहने चालविणे कठीण झाले होतेच, त्याचबरोबर चालणाऱ्या ग्रामस्थांनाही या रस्त्यावरून चालणे नामुश्किलीचे झाले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी वारंवार मागणी ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे नाईलाजास्तव हे रस्ता रोको आंदोलन आम्हाला करावे लागत आहे. या आंदोलनावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशाराही बावशी ग्रामस्थांच्या वतीने सुप्रिया खडपे तसेच ग्रा. प.सदस्य दिनेश कांडर, ग्रा. प.सदस्य मनश्री कांडर, तसेच बावशी तिरंगा ग्रामसंघाच्या सचिव दिया राणे, कार्याध्यक्ष रुपाली मरये, सिआरपी संगीता कदम, माजी अध्यक्षा विनिता कांडर, माजी सचिव रेणुका राणे यांनी दिला आहे.