
सावंतवाडी : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा अंडरग्राउंड केबलने 31 केवी, 11 केवी गावागावातील लाईन अंडरग्राउंड केबल टाकून जोडाव्यात. यासाठी खासबाब म्हणून महाराष्ट्र सरकारने याची संपूर्ण तरतूद करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.
विद्युत वितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे तसेच हम करे से कायदा ही गुर्मी असल्यामुळे आम्हाला विचारणारा कोणीच नाही अशी मनवृत्ती वीजवितरणच्या अधिकाऱ्यांची झालेली आहे. यामध्ये अनेक वेळा अपघात होऊन अनेक जीव गमवावे लागले आहेत. कालच बांदा येथेही लाईटची तार खाली पडल्यामुळे महिला दगावली. असे अनेक अपघात झालेले आहेत. वीज वितरणच्या अधिकाऱ्यानां याचे गांभीर्य नाही. तळकोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड निसर्ग संपन्न आहेत. यातील बायोडायव्हर्सिटी जगप्रसिद्ध आहे. एका बाजूने आपण झाडे लावा वृक्ष जगवा घोषणा करत असतो. ही वनराई जपण्यासाठी लाईट सप्लाय साठी असलेले केबल्स अंडरग्राउंड करणे आवश्यक आहे. यामुळे मोठमोठी झाडेही वाचू शकतात. बायोडायव्हसिटीच संतुलनही राखले जाऊ शकते. महाराष्ट्र शासनाने पूर्ण तरतूद करून अंडरग्राउंड केबल प्रोजेक्ट राबवावा असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.