क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : विलास नावळे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 13, 2023 16:11 PM
views 80  views

वैभववाडी : क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या तंदुरुस्त होतात.त्यांचा सर्वांगीण विकास खेळातून होत असतो. याकरिता अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांसाठी खेळ महत्त्वाचे आहेत असं प्रतिपादन लोरे नं२ गावचे सरपंच विलास नावळे यांनी केले. लोरे हेळेवाडी केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा  शुभारंभ  लोरे मांजलकरवाडी शाळेच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. यावेळी श्री नावळे बोलत होते.

   श्री.नावळे म्हणाले, आताच्या मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे.मुल खेळापासून दुरावत चालली आहे.मोबाईलचा अति वापर मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे गरजेचे आहे. याच खेळांमुळे भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडू शकतील,असा विश्वास श्री नावळे यांनी व्यक्त केला.  माजी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी झिम्माळ, गडमठ गावच्या सरपंच मालती शेटे, आचिर्णे गावचे सरपंच रुपेश  रावराणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी लोरे नं२ ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल केंद्राच्यावतीने सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच रुपेश पाचकुडे,सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख गौतम तांबे,सूत्रसंचालन वैभव तळेकर,आभार सुहास कदम यांनी मानले.