
देवगड : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा स्थळात स्थान मिळावे यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग कडून सह्यांचा उपक्रम हाती घेतला गेला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव दिपक करंजे यांनी सह्यांची मोहीम राबविली आहे.
आपला इतिहास जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचण्यासाठी सर्व दुर्गसेवक, शिवप्रेमी, ट्रेकर्स, सामाजिक संस्था, मंडळ यांनी जनजागृती म्हणून आमच्या या उपक्रमाप्रमाणेच विविध प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या या गडकिल्ल्यांची निवड कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग यांनी केले आहे.
जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार या ब्रीदवाक्यातून नामांकनाच्या समर्थनार्थ किल्ले विजयदुर्ग येथे विजयदुर्ग गावचे प्रथम नागरिक सरपंच रियाझ काझी यांनी आपली स्वाक्षरी करून या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ केला.
दरम्यान,माजी सरपंच तथा किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, विजयदुर्ग पोलीस पाटील राकेश पाटील, पुरातत्व विभागाचे श्री. एकांकर, विजयदुर्ग तलाठी श्री. तानवडे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश जावकर, पत्रकार बाळा कदम, सचिन लळीत, विजयदुर्ग सोसायटीचे चेअरमन महेश बिडये, ग्रामविकास मंडळाचे राजेंद्र परुळेकर, वैभववाडी कॉलेजचे प्राध्यापक श्री पाटील, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, सह्याद्रीचे दुर्गसेवक, शिवप्रेमी नागरिक आणि शिवप्रेमी मंडळ, यांनी स्वाक्षरी मोहिमेत आपला सहभाग दर्शविला होता. यावेळी देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनीही भेट देऊन आपली स्वाक्षरी करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.