विजय सावंत यांना अहिल्या शिक्षण संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 15, 2023 12:23 PM
views 240  views

सावंतवाडी : अहिल्या शिक्षण केंद्राचे संस्थापक कै. आत्माराम मोरजकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काळाचौकी येथे दिनांक १४ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक गुणगौरव कार्यक्रमात सिंधुदुर्गचे जिल्ह्यातील, दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावचे सुपुत्र, लेखक, कवी व साहित्यिक विजय अर्जुन सावंत यांचा साम टीव्हीचे ज्येष्ठ संपादक व विद्या वाचस्पती द. ग. सावंत यांच्याहस्ते शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन सत्कार करण्यात आला. याबद्दल सर्वत्र त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

स्व. श्री. आत्माराम मोरजकर यांचे मूळ कोकणातील होते. ते स्वतः एक गिरणी कामगार होते. त्यांनी आपल्या मित्रमंडळींबरोबर काळाचौकी येथे ५३ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या 'अहिल्या शिक्षण संस्थे'मार्फत २५ वर्षापेक्षा जास्त काळ स्वतःच्या शाळेतील गुणी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापकांबरोबर, इतर शाळेतील कर्तृत्ववान मुख्याध्यापक व शिक्षकांचाही सत्कार करीत असतात.

सत्कारमूर्ती आदर्श शिक्षक विजय सावंत यांचे वडीलही एक गिरणी कामगार होते. सन्माननीय श्री.मोरजकर यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे यानिमित्ताने एका कर्तृत्ववान गिरणीकामगाराच्या हातून दुसऱ्या गिरणी कामगारांच्याच मुलांचा,  पर्यायाने आपल्या परिवाराच्या सदस्याचाच आणि तोही गिरणगावात सत्कार होत असल्याची आनंददायी  भावना याप्रसंगी विजय सावंत यांनी व्यक्त केली.