वाळूशिल्पातून अयोध्येचे दर्शन..!

वेंगुर्ल्यात कलाकार संजू हुले यांनी साकारले वाळूशिल्प
Edited by:
Published on: January 21, 2024 07:32 AM
views 139  views

वेंगुर्ला : अयोध्या येथे नुतन बांधलेल्या मंदिरामध्ये सोमवारी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. याची उत्कंठा फक्त अयोध्येलाच नाहीतर संपूर्ण भारत देशाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील प्रसिद्ध झुलत्या पुलानजिक कलाकार संजू हुले यांनी मंदिर व श्रीरामांचे आकर्षक वाळू शिल्प रेखाटले आहे.

वनवासाचा कालखंड संपल्यावर पुन्हा श्रीराम अयोध्येत आल्यानंतर ज्याप्रमाणे अयोध्यावासीय श्रीरामांच्या दर्शनासाठी आतुर झाले होते, तशाचप्रकारे मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सर्व रामभक्त आतूर झाले आहेत. गावागावातही आनंदाचे वातावरण पसरले आहे. विद्युत रोषणाईने सर्व मंदिरे सजली आहेत. ठिकठिकाणी भगवे झेंडेही लावण्यात आले असून भजन, पूजन, नामस्मरण, दशावतारी नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एकंदर सर्व वातावरण राममय झाले आहे. हा सोहळा सुवर्णमय होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरिने खारीचा वाटा उचलत आहे.

वेंगुर्ला-दाभोवाडा येथील संजू हुले यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सहकार्याने झुलत्या पूलानजिक आकर्षक वाळू शिल्प रेखाटले आहे. यामध्ये अयोध्येचे राममंदिर व श्रीरामांची प्रतिकृती दर्शविली आहे. झुलत्या पूलाकडे येणारे पर्यटक तसेच स्थानिकही या वाळूशिल्पाचा आनंद लुटत आहेत.