
सावंतवाडी : साऱ्यांचेच लक्ष लागून असलेली ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे धाकोरा ग्रामपंचायत निवडणूक होती. कारण या ठिकाणी दोन संख्या बहिणींमध्ये अत्यंत तुल्यबळ लढत रंगली होती. यात थोरल्या बहिणीने धाकट्या बहिणीचा पराभव करत सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात टाकली आहे. स्नेहा मुळीक यांनी मुग्धा रेडकर या आपल्या लहान बहिणीचा पराभव केला शिवाय अपक्ष असलेल्या संध्या मुळीक यांनाही त्यांनी पराभूत करण्याची किमया साधली आहे.
केवळ तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन संख्या बहिणींमध्ये ही एकमेव लढत पहावयास मिळाली. आपल्या प्रचारादरम्यान 'कोकणसाद'शी संवाद साधताना त्यांनी विजयाचा बुलंद आत्मविश्वास व्यक्त केला होता. अखेर तो मंगळवारी लागलेल्या निकालावरून सिद्ध झाला. निकाल लागल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले. शिवाय थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आणि युवाशक्तीच्या जोरावर आपल्याला सरपंच पद मिळाले असल्याची भावनाही स्नेहा मुळीक यांनी यावेळी 'कोकणसाद'जवळ व्यक्त केली.