कथानिर्मिती सहज सोपी गोष्ट नाही : ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी

Edited by: संदीप देसाई
Published on: March 04, 2024 11:51 AM
views 56  views

राजापूर : कथानिर्मिती प्रक्रिया ही मनाच्या अनेक पातळयांवर घडत असते. ती काहीशी गूढ असते. जीवनानुभव घेत असताना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. एखाद्या बीमध्ये पाने, फुले, फळे, फांद्या यांससह वृक्षाचा आकार लपलेला असावा त्याप्रमाणे कथाबीजामध्ये कथाविस्तार लपलेला असतो. बीजधारणेपासून संपूर्ण कथेची निर्मिती होईपर्यंतचा प्रवास हा दीर्घ असून त्यात अनेक टप्पे असतात. उत्स्फूर्तता आणि जाणीवयुक्तता यांचा मिलाफ असतो. कथालेखनासाठी आवश्यक असलेल्या एखाद्या कौशल्याचा जरी अभाव असेल तरीही कथा परिणामकारक होत नाही. असे प्रतिपादन कथानिर्मिती प्रक्रिया या विषयावर बोलताना प्रसिद्ध कथा व कादंबरीकार सौ. वृंदा कांबळी यानी केले. 

     राजापूर लांजा नागरी सेवा संघ मुंबई यानी आयोजित केलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्या बोलत होत्या. लांजा तालुक्यातील शिपोशी येथील न्या. वै. वा. आठले विद्यालयाच्या भव्य प्रांगणात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे होते. तसेच उद्घाटक पितांबरी उद्योग समुहाचे प्रमुख प्रमुख रवींद्र देसाई हे होते.  सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांनी या साहित्य संमेलनात नोंदविलेला सहभाग व उपास्थिताना केलेलं मार्गदर्शन तितकच महत्वपूर्ण ठरले. यासाठी राजापूर लांजा नागरी सेवा संघाचे अध्यक्ष गीतकार सुभाष लाड यांच्याहस्ते शाल, श्रफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सौ.कांबळी यांचा सत्कार करण्यात आला.