
सावंतवाडी : मळगांव पिंपळवाडी येथील रहिवासी जेष्ठ कीर्तनकार, निवृत्त शिक्षक गणू यशवंत राऊळ उर्फ नाना मास्तर (९५) यांचे सोमवारी रात्री १०.३० वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. आज मंगळवार सकाळी ९.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील वझर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निरवडे येथे मुख्याध्यापक म्हणून ते सेवा निवृत्त झाले होते.
आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा मोठा वावर होता. ते भजन तसेच कीर्तन व प्रवचन करायचे. पिंगुळी येथील श्री संत राऊळ महाराज तसेच सिद्धगिरी मठाचे मठाधिपती महंत श्री काडसिद्धेश्वर महाराज यांचे ते अनुयायी होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. मोडी लिपीचे जाणकार होते. त्यामुळे अनेकजण त्यांचे मार्गदर्शन घेत असतं. त्यांच्या निवासस्थानी नेहमीच भजन, कीर्तन नामस्मरण तसेच आध्यात्मिक बैठक होत असे.यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करायचे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावर असायचा. एकत्र कुटुंबपद्धतीचे ते एक मूर्तीमंत उदाहरण होते. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सर्व कुटुंब शेवटपर्यंत एकत्र ठेवले होते. मृत्यू समयी देखील त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या सोबत होते.गेले काही दिवस ते आजारी होते. त्यातच सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन विवाहित बहिणी, चार मुलगे, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी ग्राम विस्तार अधिकारी भरत राऊळ व मधुकर राऊळ यांचे ते भाऊ, यशवंत राऊळ तसेच शिरोडा रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक सुभाष राऊळ, ओएनजीसीचे निवृत्त अभियंता रमेश राऊळ, मळगांव हायस्कूलचे ग्रंथपाल सतिश राऊळ याचे ते वडिल तर मळगांव ग्रामपंचायतच्या माजी सदस्या सुजाता राऊळ यांचे ते सासरे होत.