वेंगुर्लेत स्‍नॅक सेंटरचं मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन !

सुसज्ज आकांक्षी शौचालयाचंही लोकार्पण !
Edited by: दिपेश परब
Published on: March 04, 2024 15:06 PM
views 104  views

वेंगुर्ले : सिंधुरत्न समृद्धी योजने अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या बंदर येथील आकांक्षी शौचालय  (Aspirational Toilet) व घोडेबाव उदयान येथील स्‍नॅक सेंटरचे उदघाटन आज सोमवारी (४ मार्च) शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्‍न समृद्धी योजनेचे अध्‍यक्ष दीपक केसरकर यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. 

   यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे तसेच वेंगुर्ला शहरातील विविध बचत गटातील महिला व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या सर्व उदयानांमध्‍ये व पर्यटन ठिकाणी छोटी कॅन्‍टीन उभारण्‍यात येवून जास्‍तीत जास्‍त रोजगार निर्मिती करण्‍यात येणार असल्‍याबाबत मंत्री केसरकर यापूर्वी सुचित केले होते त्‍यानुसार सिंधुरत्‍न समृद्ध योजनेअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या घोडेबाव उदयान येथे स्‍नॅक सेंटर उभारण्‍यात आले. वेंगुर्ला शहरातील महिलांनी स्‍वयंपूर्ण होण्‍यासाठी तसेच त्‍यांची आर्थिक उन्‍नती होवून महिला सक्षमीकरणासाठी हे स्‍नॅक सेंटर शहरातील स्‍थानिक बचत गटांना नाममात्र शुल्‍क आकारुन चालविण्यास देण्‍यात येणार असल्‍याचे मत यावेळी मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्‍यक्‍त केले.  

     ‘स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला हरित वेंगुर्ला’म्हणून देशभरात वेंगुर्ला शहरास नावलौकिक प्राप्त झालेला आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेसह विविध प्रकारच्या सोई व सुविधा नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येतात. कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्‍या वेंगुर्ला बंदर या ठिकाणी अनेक देशी -  विदेशी पर्यटक मोठया प्रमाणावर भेटी देत असतात. त्‍याचप्रमाणे स्‍थानिक मच्छीमार बांधव व महिला या ठिकाणी मासेमारी व मासे विक्री साठी ये – जा करत असतात. या महत्‍वाच्या पर्यटन स्‍थळी  पर्यटक व नागरिकांसाठी  वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत स्वच्छ व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा शौचालयाची उभारणी करण्‍यात आलेली असून त्‍याचेही उद्घाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

    याठिकाणी महिला व पुरुष नागरीकांसाठी वेगवेगळे केबीन ठेवण्‍यात आलेले आहेत. प्रत्‍येकी ४ सीट, दिव्‍यांगासाठी रॅम्‍पची सोय, अस्वच्छता तपासण्यासाठी सेन्सर्स अशा प्रकारच्‍या  अत्याधुनिक सुविधांनी हे शौचालय परिपूर्ण आहे तसेच या शौचालयाच्‍या निम्म्या भागामध्‍ये कॉफी शॉप/ स्‍नॅक सेंटर चालविण्‍यात येणार असून यामधून प्राप्‍त होणा-या उत्‍पन्नातून सदर शौचालयाची देखभाल दुरुस्‍ती करण्‍यात येणार असल्याचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.