
वेंगुर्ले : वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात ११ फेब्रुवारी पासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला आहे. यादिवशी सकाळी उत्सव मूर्तीचे पूजन करण्यात आले. शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. शनिवार दि.१४ रोजी सायंकाळी ७ वा. दत्त प्रासादिक भजन मंडळ, कुबलवाडा यांचे भजन तसेच रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी धार्मिक विधी, रात्री सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे आगमनानंतर तरंग देवतांसह श्री रामे·श्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा, त्यानंतर तरंग देवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होईल. रथ प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. श्रींच्या दर्शनाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.











