
सावंतवाडी : कोलगाव जिल्हा परिषदेतून भाजपच्या अधिकृत उमेदवार महेश सारंग यांचा पराभव करत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ॲड. मायकल डिसोजा यांनी सावंतवाडीत लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. किंगमेकर म्हणून उल्लेख करत थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोटोसह बॅनर झळकावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मायकल डिसोजा हे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य होते. उबाठा शिवसेनेतून त्यांनी नुकताच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट करून महेश सारंग यांनी उमेदवारी खेचून आणली. त्यामुळे नुकतेच भाजपात गेलेल्या ॲड. डिसोजांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप महायुतीचे उमेदवार असणाऱ्या सारंग यांचा पराभव करत ते अपक्ष म्हणून निवडून आले. विजयानंतर त्यांनी विजयाचं श्रेय आपले वडील ख्रि. फ्रान्सिस डिसोजा व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिलं होतं. सावंतवाडीत भाजपचे अधिकृत उमेदवार भाजपातील बंडाखोरांनी पाडल्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंनी देखील तीव्र संताप व्यक्त केला होता. यात आता मायकल डिसोजांकडून शहरात ठिकठिकाणी आभाराचे बॅनर लावण्यात आले आहे. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून बॅनर लावत ते थेट सावंतवाडी शहरात पोहचलेत. शहरात लावलेल्या या बॅनरवर प्रेरणास्थान म्हणून वडीलांचा तर किंगमेकर म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोटो लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे अपक्षांमागे उभी राहीलेली अदृश्य शक्ती ही भाजप प्रदेशाध्यक्षांची होती का ? असा सवाल आता यामुळे निर्माण झाला आहे.
दरम्यान, याबाबत श्री. डिसोजा यांनी खुलासा दिला आहे. आपल्याला या बॅनरबाबत कल्पना नाही. कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले. माझ्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले नाहीत. ज्यांनी बॅनर लावलेत त्यांच्याकडून ते हटविण्यात यावेत अशी प्रतिक्रिया भाजपचे बंडखोर तथा अपक्ष कोलगाव जिल्हा परिषद सदस्य ॲड. मायकल डिसोजा यांनी दिली आहे.










