कारिवडे चर्मकारवस्तीतील पायवाटीसाठी ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 12, 2026 18:10 PM
views 84  views

सिधुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील चर्मकारवस्तीवरील पारंपरिक पायवाट खुली करून मिळावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली वडिलोपार्जित पायवाट तातडीने खुली करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, विरोधक यांच्या जुन्या घराच्या अंगणातून विहिरीकडे जाण्यासाठी पूर्वीपासून पायवाट अस्तित्वात होती. मात्र संबंधित व्यक्तीने या वाटेवरून ये-जा करण्यास मनाई केल्याने वस्तीवरील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायत कारिवडे, तहसिलदार सावंतवाडी तसेच पोलीस निरीक्षक सावंतवाडी यांच्याकडे वारंवार मांडण्यात आली होती. प्रत्यक्ष भेटी घेऊन चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाच्या पाणंद व सार्वजनिक रस्ते खुले करण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, माडखोल येथील मंडळ अधिकाऱ्यांनी सादर केलेला पाहणी अहवाल ग्रामस्थांनी अमान्य केला आहे. पाहणीदरम्यान पंचयादी न घालणे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व पोलीस पाटील यांना न बोलावणे ही गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यामार्फत पुनर्पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा व पायवाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

पायवाट बंद असल्याने शाळकरी मुले, आजारी व अपंग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक तसेच गर्भवती महिलांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. रात्री-अपरात्री रुग्णांना दवाखान्यात नेणे कठीण होते. तसेच एखाद्या व्यक्तीचा गावाबाहेर मृत्यू झाल्यास पार्थिव गावात आणणेही अवघड होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. पारंपरिक पायवाट तातडीने खुली करून न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.यावेळी अनंत कारीवडेकर, नारायण कारीवडेकर, उत्तम कारीवडेकर, स्नेहा कारीवडेकर, शारदा कारीवडेकर, भारती कारीवडेकर आदी उपस्थित होते