
वेंगुर्ले : तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिरा समोरील पुलाचे नूतनीकरण एप्रिल-मे २०२५ या कालावधीत होऊन सुद्धा त्याचे अजूनही काम अपूर्ण आहे. तरीही त्यावरून वाहतूक सुरु आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. श्री देव वेतोबाच्या यात्रे अगोदर म्हणजे दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत सदर काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको करावे लागेल असा इशारा आरवली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यानी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिरा समोरील पुलाचे नूतनीकरण एप्रिल-मे २०२५ या कालावधीत केलेले असून त्याचे अजूनही काम अपूर्ण आहे. म्हणजेच त्या रस्त्याचे झिरो पॉईट काम अजूनही केलेले नाही. तरीसुद्धा त्यावरून वाहतूक सुरु आहे. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याला लागून पाण्याच्या पाईप साठी खड्डा खोदलेला आहे व ती माती रस्त्यावर आलेली आहे. पाण्याच्या लाईनचे पाईप जोडून पाणीपुरवठा सुरू केलेला असून खड्डा खणलेली माती अजूनही रस्त्यावरच आहे. तो खड्डा अजून बुजवलेला नाही. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण होत आहे. दुचाकी, तीन चाकी तसेच इतर वाहनास मोठी अडचण येत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान दुचाकी तीन चाकी व पादचाऱ्यास सुद्धा छोटे छोटे अपघात होत आहेत. ग्रामस्थामध्ये एखादा मोठा अपघात होईल म्हणून भीतीदायक चिंता वाटत आहे.
दिनांक २०-२१ नोव्हेंबर रोजी श्री देव वेतोबाची जत्रा होणार आहे. त्या कार्यक्रमात कोणताही मोठा अपघात होऊ नये असे आम्हाला वाटते, म्हणून श्री देव वेतोबा देवाच्या जत्रे अगोदर म्हणजे दिनांक १५/११/२०२५ पर्यंत सदर काम पूर्ण करावे. अन्यथा आम्हास रास्ता रोको करावे लागेल. यामुळे लोकांच्या भावनांशी न खेळता काम तात्काळ पूर्ण करावे. जर याठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे.
शिंदे शिवसेना उपविभाग प्रमुख शंकर कुडव, शाखाप्रमुख कृष्णा सावंत, महिला शाखा प्रमुख रश्मी पेडणेकर, युवासेना पदाधिकारी अमित चिपकर, संकेत राणे, बुथप्रमुख सुभाष पेडणेकर, सचिन येसाजी, समीर राणे, अलका बर्डे, लक्ष्मी कुडव यांच्यासहित ग्रामस्थ रविंद्र साळगावकर, महेश आरोलकर, अमेय आरोलकर, संतोष जाधव, प्रताप पेडणेकर, दीपक चिपकर आदी ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकामाला दिले आहे.










