
वेंगुर्ले : सध्याचे गुन्हे घडतात ते व्यसनामधून घडतात. त्यासाठी समाजातून व्यसन मुक्ती होणे आज गरजेचे आहे. व्यसन मुक्ती साठी मनाचा निश्चय महत्वाचा आहे. व्यसनामुळे माणसाचे आयुष्य उध्वस्त होतेच त्याचबरोबर त्यांचा संसारही उध्वस्त होतो. म्हणूनच समाजात असे व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची गरज आहे. प्रत्येक माणसाने व्यसना पासून दूर राहून आदर्श नागरिक बनावे, असे प्रतिपादन वेंगुर्ले चे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले.
'व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा' शुभारंभ आज रेडी येथील यशवंत गड किल्ल्यावरून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री. निसर्ग ओतारी व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीचे फलक उभारून करण्यात आला. याप्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव अमोल मडामे, नायब तहसीलदार राजन गवस, तसेच रेडीचे सरपंच रामसिंग राणे, रेडी उपसरपंच आनंद भिसे, माजी जिल्हा सभापती अजित सावंत, आरवली गावचे सरपंच समीर कांबळी, पोलिस कॉन्स्टेबल मनोज परूळेकर व पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, नशामुक्त भारत अभियान टीम, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस यंत्रणा, दुर्गा मावळा ग्रुप सिंधुदुर्ग आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी, पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा खर्डेवाडी, जिल्हा तंबाखू नियंत्रण विभाग इत्यादी संस्थांनी आपला सहभाग दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले. त्यानंतर नशाबंदी मंडळाचे मासिक कल्याणयात्रा- व्यसनमुक्तीच्या गाथा चे प्रकाशन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले. यावेळी व्यसनमुक्ती विषयावर शिरोडा खर्डेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे पथनाट्य सादर केले.
जगाच्या नकाशावर ऐतिहासिक वारसा स्थळे असणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले हे शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी प्रेरणादायी स्थळे असली तरी सध्या अनेक ठिकाणी नशेच्या पदार्थांचा वापर व अस्वच्छता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर गडकिल्ले व्यसनमुक्त करून ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून नशाबंदी मंडळाच्या वतीने अमली पदार्थविरोधी जनजागृती सुरु आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांबरोबर मिळून या चळवळीला नवा वेग देण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात येत आहे. गडचिरोलीतील डॉ. अभय बंग यांच्या मुक्तीपथ चळवळीच्या धर्तीवर सिंधुदुर्गातही अमली पदार्थ विरोधी मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे उद्दिष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हे आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात. अशा किल्ल्यांवर नशा करणे योग्यच नाही. मुळात कुठच्याही व्यसनामुळे आपण आपलं आयुष्य चांगलं करूच शकत नाही. त्यामुळे व्यसनाच्या विळख्यापासून दूर राहणे हेच गरजेचे असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले.
रेडी येथील आजच्या सोहळ्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कोकण विभागीय अध्यक्ष गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष उत्कषा वेंगुर्लेकर व दुर्ग मावळाचे सदस्य समिल नाईक, साईप्रसाद मसगे, दुर्गरक्षक प्रतिष्ठान, रेडी अध्यक्ष नारायण तेंडोलकर, सचिव भूषण मांजरेकर, सदस्य अनसा भगत, राजाराम उर्फ आबा चिपकर, शस्त्र प्रदर्शन ज्ञानेश्वर राणे, ग्रामसेवक बागायतकर, पोलिस पाटील, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशासेविका, बचत गट महिला, जिल्हा आरोग्य तंबाखू नियंत्रण मंडळ व इतर शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते. तसेच नशाबंदी मंडळाचे कोकण विभाग प्रमुख व मुंबई उपनगर संघटक दिशा कळंबे, मुंबई शहर संघटक चेतना सावंत, नशामुक्त भारत अभियान पालघर जिल्हा सदस्य, नशाबंदी मंडळाचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील उपस्थित होते.
यावेळी गडावर ज्ञानेश्वर गोविंद राणे यांनी केलेल्या इतिहासकालीन साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, जिल्हा आरोग्य खाते, शाळकरी मुले, शासकीय नियम शासकीय अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार दर्शना पाताडे यांनी केले.










