
वेंगुर्ला : वेंगुर्ला - सातार्डा बस फेरी अनागोंदी नियोजनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला होता. सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही बस बरी तात्काळ पूर्ववत न केल्यास वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून पुढे जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्गच्या सीमेवरील ग्रामस्थांच्या मदतीला गोव्यातील कदंबा धावून आली आहे. "वास्को ते वेंगुर्ला" व ''पणजी ते वेंगुर्ला'' मळेवाड मार्गे अशी बससेवा सुरू करण्याचा निर्णय केटीसीएलने घेतला आहे.
यामुळे मोठा दिलासा प्रवाशांना मिळाला आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करून केटीसीएलने 'पणजी ते वेंगुर्ला' या मार्गावर बस सेवा सुरू केली आहे. परवरिम-म्हापसा-करसवाडा-कोववाळ-धारगळ-पेडणे-सातार्डा-मळेवाड-शिरोडा- वेंगुर्ला आणि पुन्हा उलट मार्गे ही बस जाणार आहे. पणजीहून सायंकाळी ४.३० वाजता व वेंगुर्लाहून सकाळी ०७.०० वाजता ही बस फेरी असणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा पणजी डेपोचे डीएम गिरीश गौडे, पणजी डेपोचे सर्वजीत बर्वे एटीएस पणजी डेपो, देवीप्रसाद भट एटीआय पणजी डेपो, केटीसीएलचे इतर कर्मचारी आणि इतरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या बस फेरीचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागणीनुसार, कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने केटीसीएलचे अध्यक्ष उल्हास तुयेंकर यांच्या प्रयत्नांनी बस सेवा सुरु केली आहे. तसेच केटीसीएलचे एमडी रोहन कासकर, जीएम महेंद्र पेडणेकर, डीटीओ अँड्र्यू परेरा व इतरांचे आभार मानले आहेत.
तसेच वास्को डेपोतून ''वास्को ते वेंगुर्ला'' (मळेवाड मार्गे) निघालेली ही बस सडा (०५.५५)- व्हीएससी (०६.००)-पीएनजे (०७.१५)-एमपीएस (०७.४०) आणि त्याच दिवशी परत (सकाळी १०.०५ वा.) अशी सेवा देणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील वेंगुर्ला आगारातून ढिसाळ नियोजनामुळे ही बस सेवा कोलमडली होती. यामुळे विद्यार्थ्यी, नोकरदार, वयोवृद्ध, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मळेवाड उपसरपंच श्री. मराठे यांनी देखील याबाबत वेंगुर्ला आगाराला इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, याचदरम्यान गोवा मदतीला धावून आले. गोवा राज्यातील 'कदंबा' या प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी पुढे सरसावली आहे. त्यामुळे कदंबा प्रशासनाचे आभार व्यक्त केले जातायत