
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्यामधील सर्वात जुनी म्हणून गणली जाणारी वेंगुर्ले नगर परिषद यावर्षी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी गेल्या दोन वर्षापासून वेंगुर्ले येथे सर्वच्या सर्व नाटके हाऊसफुल गर्दीच्या उत्साहात संपन्न झाली होती. तथापि, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र केंद्र गतवर्षी निर्माण केले आहे. यावर्षी वेंगुर्ले नगर परिषद आपला शतकत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत असल्याने सिंधुदुर्ग केंद्रावरील सर्वच्या सर्व प्राथमिक फेरीतील नाटके यंदा वेंगुर्ल्यातील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित करावीत, अशी मागणी माझा सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांनी मुंबई येथे संचालक वीबीशन चौरे यांची भेट घेऊन केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने घेण्यात येणारी 62 व 63 वी हौशी मराठी नाट्य स्पर्धा वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली होती. गेली दोन्ही वर्षे या नाट्य स्पर्धेमध्ये सादर होणाऱ्या नाटकांना रसिकांनी हाउसफुल गर्दी करत मोठा प्रतिसाद दिला होता. वेंगुर्ला हे शहर मुळातच कलासक्त असून अनेक नाटककार व साहित्यिक वेंगुर्ल्याच्या भूमीने मराठी साहित्य क्षेत्राला दिले. वि. स. खांडेकर, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, मधुसूदन कालेलकर यासारख्या थोर साहित्यकांची परंपरा वेंगुर्ल्याला आहे. वेंगुर्ले नगरपालिकेच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात सुसज्ज असे मधुसूदन कालेलकर नाट्यगृह उभारण्यात आले आहे. गेली दोन वर्षे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी वेंगुर्ल्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली. तथापि, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गतवर्षी या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग हे स्वतंत्र केंद्र घोषित केले आहे. त्यामुळे यावर्षी नाट्यरसिक व नाट्य निर्मिती करणाऱ्या संस्थांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. वेंगुर्ल्यात मोठ्या प्रमाणावर नाट्य रसिक असून विविध विषयावरील दर्जेदार नाट्य कृतीही जिल्ह्यातील विविध नाट्य संस्थांमार्फत सादर केल्या जातात.
२५ मे १८७६ रोजी वेंगुर्ल्यात ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या नगर परिषदेला यावर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. हा मोठा योग संपन्न होत असून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने यावर्षीची 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी संपूर्णपणे वेंगुर्ल्यात आयोजित करावी, अशी मागणी सचिन वालावलकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मंत्रालय मुंबई येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विबीषण चौरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी समन्वयक म्हणून माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. चौरे यांनी माझा वेंगुर्ला संस्थेच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन वालावलकर यांना दिले.










