
वेंगुर्ले : आज वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेत पुन्हा एकदा कोकणात अव्वल ठरली आहे. याचे सर्व श्रेय जर कोणाला जाते तर ते नगरपरिषदेच्या अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना यामुळे येणाऱ्या काळात सत्ता आल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण हे आमच्या संघटनेच पाहिलं कर्तव्य असेल असे प्रतिपादन वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश निकम यांनी वेंगुर्ले येथे केले. वेंगुर्ला नगर परिषदने शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत कोकण विभागात प्रथम, राज्यात तृतीय व देशात पंधरावा क्रमांक पटकावला. याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अधिकारी व स्वछता कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संघटिका सुकन्या नरसुले, महिला संघटिका तथा माजी नगरसेविका सुमन निकम, तालुका महिला संघटीका साक्षी चमणकर, नगरपालिकेचे अधीक्षक अभिषेक पाटील, माजी अधिक्षक संगीता कुबल, उभादांडा सरपंच निलेश चमणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात वेंगुर्ला नगरपालिकेतील अधिकारी व स्वच्छता कर्मचारी असे मिळून एकूण ११८ जणांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माझं कर्तव्य व माझी जबाबदारी समजून ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात काम केलं त्यांना माझा मानाचा मुजरा. तुमच्या स्वच्छते वर नागरिकांच आरोग्य अवलंबून असत. त्यामुळे महाराष्ट्रात ज्यावेळी आमचे सरकार येईल त्यावेळी नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच सर्वात प्रथम काम आम्ही करू. आमची जबाबदारी नुसतं सत्कार करून संपत नाही तर सातत्याने आम्ही तुमच्या पर्यंत पोचून तुम्हाला नेहमीच पाठबळ देऊ असे यावेळी बाबुराव धुरी यांनी सांगितले. यावेळी बोलताना रुपेश राऊळ म्हणाले की, वेंगुर्ले शहराला इतिहासकालीन परंपरा आहे. या शहराला गतवैभव प्राप्त असताना ते टिकवण्याचा जो प्रयत्न तुम्ही करताय त्याला माझ्यासख्या कार्यकर्त्याचा सलाम आहे. १५० वर्षाची परंपरा लाभलेल्या नगरपालिकेचा नावलौकिक टिकवण्याचा जे अधिकारी कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या सत्कारच कार्य आमच्याकडून घडतय यासाठी आम्ही भाग्यवान समजतो असे राऊळ म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या पक्षाच्या धर्तीवर आम्ही काम करत असताना या सत्कार समारंभाचे आम्ही नियोजन केले. वेंगुर्लेचे नावलौकिक होताना उर भरून येत. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या माध्यमातून सुरुवात झालेल्या या स्वच्छता चळवळीला आज एका उंचीवर नेऊन ठेवल आहे. याचे सर्व शिलेदार तुम्ही अधिकारी व कर्मचारी आहात तुमचा सन्मान करणं ही आमची जबाबदारी आहे असे परब म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक तुषार सापळे यांनी तर आभार माजी नगरसेविका सुमन निकम यांनी मानले.