पाण्याचा स्वभाव समजून जलसंवर्धन करा

पाण्याची तूट भासणार नाही : रुपाजी किनळेकर
Edited by: दिपेश परब
Published on: July 06, 2025 15:59 PM
views 37  views

वेंगुर्ला :  सध्या सुकाळाची परिस्थिती असली तरी दुष्काळ कधी येईल याचा भरवसा नाही. त्यामुळे जलसंधारणा बरोबरच जलसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. “पाण्याचा स्वभाव समजून घेतला आणि योग्य पद्धतीने जलसंवर्धन केले तर पाण्याची तूट भासणार नाही,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे क्षमता बांधणी व समुदाय विकास तज्ञ रुपाजी किनळेकर यांनी केले.  

वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉलमध्ये ४ जुलै व ५ जुलै रोजी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, आशा, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी उपअभियंता प्रफुलकुमार शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम प्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या समन्वयक अंमलबजावणी सहाय्य संस्थ क्षमता बांधणी व प्रशिक्षण प्रज्ञा सावंत यांनी “ग्रामीण भागातील बदल एका दिवसात होत नाही, तो हळूहळूच होतो; परंतु त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक आहे,” असे सांगत लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. समारोप प्रसंगी कनिष्ठ अभियंता अनुप वळवी, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, तुळस उपसरपंच सचिन नाईक आणि श्री. मोबारकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शेवटी, गट समन्वयक द्रौपदी नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जे. पी. एस फाउंडेशन, लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसांच्या प्रशिक्षणात नचिकेत पवार,  फिजा मकानदार आणि सगुण जाधव यांनी प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.