
वेंगुर्ले : भारतात महिलांना अनेक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आव्हानांना तोंड द्यावे लागते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या आव्हानांमध्ये शिक्षणाचा अभाव, गरीबी, हिंसा आणि सामाजिक असमानता यांचा समावेश आहे. यासाठी महिलांनी समतोल व सकस आहाराकडे पण लक्ष दिला पाहिजे असे आवाहन जनसेवा प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सई लिंगवत यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ऍड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग, बहि:शाल शिक्षण मंडळ आयोजित परिसंवाद व चर्चा या कार्यक्रमात सई लिंगवत बोलत होत्या. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात 'महिलांचे आरोग्य व समस्या' या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, महिलांनी शारीरिक, भावनिक मानसिक आरोग्याचे संतुलन राखण आवश्यक असुन दिवसेंदिवस महिलांमध्ये वंध्यत्व, कर्करोग, हृदयविकार वाढत आहेत. महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग व हृदयविकार वाढत असुन या बाबतीत नियमित तपासण्या करून सोबत जनजागृती केली पाहिजे. तर दुसऱ्या सत्रात साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील यांनी ' महिला सबलीकरण ' या विषयावर बोलताना महिला सक्षमीकरण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ज्यासाठी सरकार, सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. जेव्हा महिला सक्षम होतील, तेव्हा कुटुंब, समाज आणि देश प्रगती करेल असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर बहि:शाल शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. संजीव लिंगवत, मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. सोनाली सावंत, डॉ. राखी माधव, डॉ. दिपाली देसाई, डॉ. रुपाली माळी, डॉ. सिध्दी सावंत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतिश पाटील यांनी तर स्वागत व आभारप्रदर्शन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.